महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा यंदा ऐतिहासिक निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेच्या ५७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मानाच्या पुरुषोत्तम करंडकासाठी एकही एकांकिका पात्र न आढळल्याने करंडक कोणत्याच संघाला न देण्याचा निर्णय परीक्षकांनी घेतला आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पौर्णिमा मनोहर, परेश मोकाशी आणि हिमांशू स्मार्त यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
(हेही वाचा – RBI Tokenization Rule: क्रेडिट, डेबिट कार्डने पेमेंट करताय? पुढील महिन्यापासून होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल)
तसेच, सर्वोत्तम अभिनय, वाचिक अभिनय आणि दिग्दर्शन या विभागांतही पात्र कलाकार नसल्याने परीक्षकांनी ही पारितोषिकेही कोणालाही जाहीर केली नाहीत. करंडकासाठी पात्र एकांकिका नसली तरी सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) या महाविद्यालयाच्या ‘कलिगमन’ या एकांकिकेस जाहीर झाले आहे. या संघास पुरुषोत्तम करंडक मिळणार नसला तरी पाच हजार एक रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या ‘भू भू’ या एकांकिकेस द्वितीय क्रमांकाचा हरी विनायक करंडक तर, शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या ‘गाभारा’ या एकांकिकेस तृतीय क्रमांकाचा संजीव करंडक जाहीर झाला आहे. मात्र यंदा सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे बक्षीसही कोणताही पात्र नसल्याने जाहीर करण्यात आले नाही.
परीक्षकांच्या या निर्णयामुळे मात्र स्पर्धक आणि एकाकिंका स्पर्धांमधून काम करत आज मनोरंजन क्षेत्रात यश संपादन केलेल्या तमाम रंगकर्मींनी नाराजी व्यक्त केली आहे. दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याने फेसबूक पोस्ट लिहीत या निकालाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुरुषोत्तम करंडकामुळे मला नाटकाची आवड निर्माण झाली. या स्पर्धेने जे प्रोत्साहन दिलं ते आजही पुरून उरतं. त्याचा यावर्षी असा निकाल लागला याने फार वाईट वाटलं. हे चूक-बरोबर हा वाद घालून आता काही साध्य होणार नाही, पण नुसतं गप्पं राहून पण चालणार नाही, असे निपुणने म्हटले आहे.