‘एक राज्य एक आकाशवाणी केंद्र’ या धोरणाचा फटका

105

‘प्रसार भारती’च्या एक राज्य एक प्राथमिक आकाशवाणी केंद्र या धोरणाचा फटका महाराष्ट्रातील पुण्यासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आणि भारतातील सर्वाधिक श्रोते असणार्‍या आकाशवाणी केंद्राला बसत आहे. या संदर्भातील सविस्तर निवेदन पुणे दौर्‍यावर असणार्‍या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना आमदार आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आकाशवाणीच्या नैमित्तिक उद्घोषकांकडून देण्यात आलं. यावेळी आकाशवाणीचे विद्यागौरी ताम्हनकर, अर्चना साने आणि विराज सवाई हे प्रतिनिधी उपस्थित होते.

( हेही वाचा : विमानतळावरून आता २४ तास ‘बेस्ट’ सेवा! पहा वेळापत्रक… )

कार्यक्रमांच्या निर्मितीवरच मोठी बंधने

१९५२ सालापासून दर्जेदार कार्यक्रमांची सातत्याने निर्मिती करणार्‍या पुणे केंद्राचं स्थान जगभरातल्या लाखो श्रोत्यांच्या मनात कायमचं वरचं आहे. प्रसार भारतीच्या चुकीच्या धोरणांमुळे स्थानिक कलाकार, तज्ज्ञ, निवेदक, कार्यक्रम सहाय्यक यांच्या कामावर तसेच कार्यक्रमांच्या निर्मितीवरच मोठी बंधने आली आहेत.

दिवसभरात ६०% ते ८०% इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबई आणि दिल्ली केंद्रांवरून केल्या जाणार्‍या सहक्षेपणामुळे पुणे केंद्राच्या शेकडो मान्यताप्राप्त कलाकारांना सरकारी आणि हक्काचं व्यासपीठच उरलं नसल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. श्रोत्यांनीही मोठ्या संख्येने या बदलाला विरोध दर्शवला असून लवकरात लवकर पुणे केंद्राची प्रसारण सेवा पूर्ववत करण्यात यावी अशी आग्रही मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

दिशाभूल करणारे विधान

News on AIR या mobile app मुळे आपले आवडते आकाशवाणी केंद्र जगभरातून कुठूनही ऐकू शकत असताना प्रसार भारतीकडून घेतलेल्या “या निर्णयामुळे, स्थानिक कलाकारांना त्यांचे विचार आणि कला प्रसारीत करण्यासाठी ‘राज्यव्यापी’ व्यासपीठ उपलब्ध होईल.” असे चमत्कारिक आणि दिशाभूल करणारे विधान करण्यात येत आहे. पुणे केंद्राची स्वायत्तता टिकावी, त्याचबरोबर कारगिल युद्ध ते कोरोना संकटकाळीही पूर्ण क्षमतेने काम करत अत्यंत कठीण प्रसंगांत महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या पुणे केंद्राची समृद्ध परंपरा कायम रहावी; यासाठी नैमित्तिक उद्घोषकांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं. या निवेदनाचा स्विकार करून आकाशवाणीच्या प्रतिनिधींचं म्हणणं गांभीर्याने ऐकलं आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून यावर चर्चा केली जाईल असे आश्वासन अनुराग ठाकूर यांनी दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.