बाबासाहेबांचे ‘ते’ स्वप्न कधी साकार होणार?

'माझ्या जनशताब्दीच्या दिवशी शिवसृष्टी उभी राहिलेली असेल', असा विश्वास बाबासाहेबांनी व्यक्त केला होता.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या १००व्या वर्षी निर्वाण झाले आणि शिवकालीन इतिहास संशोधनाच्या महत्कार्यात भरून न येणारी पोकळी तयार झाली. यानिमिताने बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुनरुज्जीवित करण्याच्या महान कार्याविषयी कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी त्यांचे पुण्यात ‘शिवसृष्टी’ उभी करण्याचे स्वप्न जे अपुरे राहिले, त्याची सल मात्र हजारोंच्या मनात सलत आहे. ‘माझ्या जनशताब्दीच्या दिवशी शिवसृष्टी उभी राहिलेली असेल’, असा विश्वास बाबासाहेबांनी व्यक्त केला होता, मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही, आजमितीस शिवसृष्टीचे काम एक चतुर्थांश पूर्ण झाले आहे, ही शिवसृष्टी उभी करणे हीच बाबासाहेबांसाठी खरीखुरी श्रद्धांजली ठरेल, असे मत महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम म्हणाले. यानिमित्ताने बाबासाहेबांच्या या स्वप्नाचा घेतलेला मागोवा…

21 एकराच्या जागेवर उभारतोय शिवकालीन इतिहास 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’ या महानाट्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन महाराष्ट्राच्या बाहेरही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची जाण प्रभावीपणे निर्माण केली. व्याख्यानमाला, ‘जाणता राजा’सारखे महानाट्य आणि अलिकडच्या काळात ‘शिवसृष्टी’’ ही क्रमाक्रमाने पुढे आलेली शिवशाहिरांची सृजन संपदा. पुण्याजवळील नर्‍हे आंबेगाव (बुद्रुक) या ठिकाणी 21 एकर जागेत शिवसृष्टी उभी राहत आहे. ही शिवसृष्टी आशिया खंडातील सर्वात मोठे ऐतिहासिक थीम पार्क असणार आहे. ‘शिवचरित्राचा प्रसार आणि प्रचार’ या उद्देशाने सुरू झालेले शिवसृष्टी निर्मितीचे काम आधुनिक तंत्रज्ञानाने आणि वास्तुरूपाने साकार होत आहे.

(हेही वाचा : शिवशाहिरांचे निर्वाण)

शिवाजी पार्कात संकल्पनेची निर्मिती!

‘शिवसृष्टी’ हे एका रात्रीत पाहिलेले स्वप्न नाही. सुमारे पन्नास वर्षांची अखंड साधना या प्रकल्पाचे अधिष्ठान आहे. 1967 साली एप्रिल महिन्यात बाबासाहेब पुरंदरे, राजमाता सुमित्राराजे भोसले, श्रीमंत प्रतापसिंहराजे भोसले, मुकुंदराव दाबके व इतर मंडळींनी एकत्र येऊन शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’ची स्थापना केली. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्षे झाली, त्या निमित्ताने 1974 साली मुंबईच्या शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) बाबासाहेब पुरंदरे यांनी अस्थायी स्वरूपाची शिवसृष्टी साकार केली होती. अनेक उद्योजकांनी, कलावंतांनी, राजकारणी मंडळींनी या शिवसृष्टीला भेट दिली. महाराष्ट्रातील तमाम जनतेला एकाच जागी शिवकार्य आणि शिवकाळ अनुभवता आला. यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा सूचना केली होती की, महाराष्ट्रात स्थायी स्वरूपाची शिवसृष्टी उभारली जावी. यशवंतरावांनी सूचना केली आणि बाबासाहेबांच्या मना-मेंदूत ती घट्ट रुजली. शिवसृष्टी हाच बाबासाहेबांचा ध्यास झाला. राज्यात आणि देशात विविध ठिकाणी शिवव्याख्याने देऊन त्यांनी निधीसंकलनास सुरुवात केली. 14 एप्रिल 1985 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनानिमित्ताने बाबासाहेबांनी ‘जाणता राजा’ हे महानाट्य साकार केले. आतापर्यंत त्यांचे बाराशेपेक्षा जास्त प्रयोग झाले. त्यातून येणारा सर्व निधी शिवसृष्टीसाठी जमा होऊ लागला. ‘जाणता राजा’ या महानाट्याचा पहिला प्रयोग पुण्यात झाला होता.1995 साली महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे युती सरकार आले. या सरकारने प्रतिष्ठानला नर्‍हे आंबेगाव (बु.) येथे 21 एकर जमीन शुल्क आकारून खरेदीने दिली.

पहिला टप्पा पूर्ण 

शिवसृष्टीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सरकारवाडा बांधून पूर्ण झाला आहे. भवानी मंदिराचे आणि राजसभेचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. लवकरच ते पूर्ण होईल. भविष्यात येथे दररोज 15 हजार लोक येतील, हे लक्षात घेऊन वाहनतळाची व इतर गोष्टींची उभारणी सुरू आहे. गेली बारा वर्षे येथे घोडेस्वारी शिकवली जात आहे. येथे जे वाहनतळ उभारले जात आहे, त्याच्या छतावर पुढे घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिले जाईल. आगामी पाच-सहा वर्षांत पूर्ण प्रकल्पाचे लोकार्पण व्हावे, या दिशेने प्रयत्न चालू आहेत. या महाप्रकल्पाला अंदाजे 350 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी निधीसंकलन करणे हे एक शिवधनुष्यच आहे आणि समाजबांधवांच्या, शिवप्रेमींच्या मदतीने साध्य करण्याचा प्रयत्न होत आहे.

असे आहे ‘शिवसृष्टी’चे स्वरूप!

शिवसृष्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात आपण 350 वर्षे मागे जाऊ. या परिसराची दगडी तटबंदी, बुरुज आणि सरकारवाडा पाहिले की हे लक्षात येते. हे बांधकाम करताना पुढील कमीत कमी शंभर वर्षे ते टिकून राहील, याचा विचार केला आहे. हा परिसर लक्षात घेता भूकंपरोधक बांधकाम करण्यात येत आहे. इथे प्रवेश केल्यानंतर 17व्या शतकात गेल्याचा भास होईल, अशा प्रकारची रचना निर्माण केली जात आहे. शिवसृष्टीच्या रंगमंडलात विविध प्रसंग साकार होणार आहेत. विविध प्रकारची आधुनिक तंत्रज्ञाने वापरून हे बांधकाम होत आहे. इथे साकार होणार्‍या पावनखिंडीच्या लढाईत पर्यटक/शिवभक्त सहभागी होणार आहे. अडीच मजले उंचीवरून पर्यटक हा प्रसंग पाहू लागतील, तेव्हा त्यांना फाइव्ह-डी तंत्रज्ञानामुळे महाराजांचा पन्हाळा ते विशालगड प्रवास दिसेल. सिद्दी जोहरने केलेला पाठलाग दिसेल आणि पावनखिंडीत प्रत्यक्ष तुंबळ युद्ध सुरू होईल, तेव्हा अडीच मजले उंचीवर असणारे पर्यटक खाली येतील, त्यांच्यासमोर अगदी पाच-सहा फुटावर युद्ध सुरू असेल. अशा वेळी एक मावळा येईल आणि पर्यटकाला स्पर्श करून म्हणेल, “तुम्ही इथे काय करताय? निघा.” आधुनिक तंत्रज्ञानामुळे पर्यटकांना, शिवभक्तांना 350 वर्षे मागे घेऊन जाणे शक्य होणार आहे. 65 हजार चौरस फुटाची राजसभा तयार करण्यात येणार आहे. त्या वास्तूच्या तळघरात डार्क राइड उभे करण्यात येणार आहे. ‘डार्क राइड’च्या माध्यमातून शिवछत्रपतींची आग्य्राहून सुटका प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. त्यासाठी व्हर्च्युअल रियालिटी या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. शेती, पर्यावरण, राजभाषा, राजकोश, समाजकारण, न्याय, रस्ते इत्यादीसंबंधीची छत्रपतींची आदर्श तत्त्वे आणि नीती स्पष्ट करणार्‍या कलाकृती इथे पाहायला मिळतील. पुरंदरचा तह ते आग्रा भेट आणि आग्रा ते राजगड या प्रवासावर तेरा प्रसंग साकारणार आहे. मुळात शिवसृष्टी उभारताना छत्रपती काय होते? त्यांनी काय आदर्श कार्य केले? हेच पुढच्या पिढ्यांना दाखवायचे आहे, हाच या मागील उद्देश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here