कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परदेशी नागरिकांची विमानतळावर तपासणी केली जात आहे. पुण्यातही ओमायक्रॉनचे रूग्ण आढळून आल्यामुळे प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. याकरिता परदेशी नागरिकांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येत आहे. तसेच यापूर्वी परदेशांतून आलेल्या प्रवाशांचे ट्रेसिंग सुरू आहे. यातील १ हजार लोकांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
१ हजार लोक बेपत्ता
परदेशी नागरिकांमधील ३ हजार २०० पैकी सध्या सुमारे २ हजार २०० जण सापडले आहेत. त्यातील सुमारे २ हजार जणांची आरटी-पीसीआर चाचणी झाली आहे. यातील दोघांना ‘ओमायक्रॉन’ची बाधा झाल्याचे यापूर्वीच निष्पन्न झाले आहे. परंतु उर्वरित १ हजार लोकांचा शोध लागलेला नसून अद्याप हे लोक बेपत्ता आहेत. परदेशांतून आलेल्या ७५० जणांची विमानतळावरच टेस्ट करण्यात आली असून, महापालिकेने शोधून काढत उर्वरित १ हजार २०० जणांची घरी आल्यानंतर चाचणी केली आहे.
( हेही वाचा : राजापुरात सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? )
महापालिकेची माहिती
पुणे, मुंबई आणि नागपूर विमानतळांवर परदेशांतून मोठ्या संख्येने नागरिक येतात. ज्या देशांत ओमायक्रॉन रुग्ण आढळलेले आहेत, अशा देशांतून या तीनही विमानतळांवर १ डिसेंबरपासून आतापर्यंत ११ हजार ७५१ प्रवासी आले. तर, इतर जोखमीचे नसलेल्या देशांतून ६५ हजार ७७९ प्रवासी आले आहेत, असे महापालिका आरोग्य विभागाने सांगितले.
Join Our WhatsApp Community