येरवडा कारागृहात तीन कैद्यांचा मृत्यू; कारागृह प्रशासनाने सांगितले ‘हे’ कारण

येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये तीन कैद्यांचा मृत्यू झाला आहे. या तीन कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या आजारामुळे झाला आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी एका कैद्याचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी कारागृहात गेले, त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

शाहरुख बाबू शेख, संदेश अनिल गोंडेकर, रंगनाथ चंद्रशेखर दाताळ अशी मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत. संदेश गोंडेकर याच्यावर 2018 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, तेव्हापासून तो येरवडा कारागृहात आहे. त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी नियमीतपणे जात होते. 31 डिसेंबरला त्याचे वडील त्याला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.

यानंतर संदेश यांच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी कारागृह प्रशासनाला जबाबदार धरत आक्षेप नोंदवला. यानंतर येरवडा कारागृहातील अधिकारी व वैद्यकीय अधिका-यांनी त्याचा मृत्यू लिव्हर सोरायसिस या आजाराने झाल्याचे स्पष्ट केले.

( हेही वाचा: स्पेलिंग चुकली आणि Google हे नाव पडलं; गुगलच्या जन्माची गंमतीदार कथा )

इतर दोन कैद्यांच्या मृत्यूचे कारण काय?

याशिवाय शाहरुख शेख व रंगनाथ दाताळ हे दोन्ही कैदी वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले होते. यातूनच त्या दोघांचा मृत्यू झाला. यासंदर्भात येरवडा कारागृह प्रशासनाने संबंधित मृत कैद्यांच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यामार्फत कळवले आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here