वाहतूक पोलिसांनी रस्त्यांवर वाहने अडवून दंडात्मक कारवाई करू नये, असा स्पष्ट आदेश सहपोलिस आयुक्तांनी वाहतूक शाखेला दिला आहे. त्यामुळे वाहतूक नियमनाकडे काणाडोळा करून केवळ दंडात्मक कारवाईला प्राधान्य देणाऱ्या शहर वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला यामुळे चाप लागणार आहे.
एका कोपऱ्यात थांबून दंडात्मक कारवाई करायचे
‘नो पार्किंग’मधील वाहने चालकासमोर उचलून टोइंगचे बेकायदा शुल्क उकळणे, वाहनचालक पावती करीत असेल, तरी गाडी ‘टोइंग’चा आग्रह धरणे, गाडी उचलणाऱ्या तरुणांची अरेरावी आणि त्यांच्याच हाती दंडात्मक कारवाई करण्याचे मशीन बेकायदा सोपविण्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांविरोधात वाढत आहेत. या प्रकारांविरोधात तक्रार आल्यानंतरही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी गेल्या काही दिवसांत शहरातील महत्त्वाच्या चौकांची पाहणी केली. त्यात गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिस चौकात नव्हते, तर काही ठरावीक चौकात पोलिस असले, तरी वाहतूक नियमनाऐवजी एका कोपऱ्यात थांबून दंडात्मक कारवाईवरच अधिक भर असल्याचे पाहायला मिळाले. या विषयी वृत्तमालिका प्रसिद्ध केली. त्याची दखल घेऊन सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक पोलिसांना केवळ वाहतूक नियमन करण्याचा आदेश दिला आहे. ‘पुढील आदेशापर्यंत वाहतूक पोलिसांनी दंडात्मक करवाई करू नये,’ अशी सूचना कर्णिक यांनी वाहतूक शाखेला दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे ही कारवाई किती काळ बंद राहणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
(हेही वाचा पुण्यात भीषण स्फोट, पोलीस अलर्ट मोडवर)