पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील डेक्कन जिमखाना बस स्थानकापासून भिडे पुलाकडे नदी पात्रातून जाणारी वाहतूक पुढील दोन महिन्यांसाठी बंद रहाणार आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी मार्गाचं काम सुरू करण्यात आल्याने वाहतुकीत हा बदल करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून ही माहिती देण्यात आली.
(हेही वाचा – दाऊद गँगच्या मुसक्या मुंबई पोलीस आवळणार, गृहमंत्री फडणवीसांचे आदेश)
पोलिसांच्या माहितीनुसार, डेक्कन जिमखाना येथील मेट्रो स्टेशनवर जाण्यासाठी डेक्कनच्या मुख्य चौकातील पीएमपीच्या बस स्थानकाजवळ पादचारी पुलाचे तसेच तिथे जाण्यासाठीच्या जोड रस्त्याचे काम सुरू झाले आहे. वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गावर डेक्कन जिमखाना येथे मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. त्यामुळे डेक्कनहून भिडे पुलाकडे जाणारा मार्ग पुढील दोन महिने म्हणजेच १४ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
या पर्यायी मार्गांचा करा वापर
- डेक्कन येथून भिडे पुलामार्गे नारायण पेठेत येणाऱ्या वाहन चालकांनी लकडी पुलाचा वापर करावा.
- जंगली महाराज रस्ता किंवा आपटे रस्त्याने डेक्कन बसस्टॉप लागत असलेल्या रस्त्याने भिडे पुलावरून जाऊ इच्छिता त्यांच्यासाठी हा मार्ग उपलब्ध नसेल.
- खंडोजीबाबा चौकाकडून डावीकडे टिळक चौकापासून केळकर रस्त्याचा वापर पुणेकरांनी करावा.
- दुचाकीने प्रवास करण्यासाठी झेड ब्रिजचा वापर करता येणार आहे.