पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातील एका आरोपीला पुणे पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. संतोष जाधवला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधवचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. आता त्याची कसून चौकशी केली जात आहे. संतोष हा लाॅरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य आहे.
संतोष जाधव आणि नागनाथ सूर्यवंशी यांची नावे मुसेवाला हत्याकांडात समोर आली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत संतोष जाधवचा शोध सुरु केला होता. त्यादरम्यान पोलिसांनी सिद्धेश कांबळे उर्फ महांकाल याला आधीच पोलिसांनी अटक केली होती.
( हेही वाचा: अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा बंगळुरु पोलिसांच्या ताब्यात! )
संतोष जाधवची चौकशी सुरु
2021 साली पुण्यातील मंचरमध्ये झालेल्या हत्याकांड प्रकरणी संतोष जाधवचा गेल्या काही महिन्यांपासून पोलीस शोध घेत होते. राण्या बाणखेलेच्या खुनानंतर संतोष जाधव फरार झाला होता. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातही त्याचा हात असल्याचा पोलिसांचा संशय होता, शेवटी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला गुजरातमधून अटक केली आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे.