महापालिकेसाठी ३ हजार संगणकांची खरेदी : एका संगणकाची किंमत पाहून आवाक व्हाल

159

महापालिकेतील वाढते संगणकीकरण व कालबाह्य झालेली उपकरणे यामुळे आता संगणकांची मागणी वाढत चालली आहे. महापालिकेत तब्बल ९ हजार संगणकांची मागणी असून यासाठी तब्बल ३ हजार संगणकांची खरेदी करण्याची प्रक्रिया माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून राबवली जात आहे. यासाठी तब्बल ८५ हजारांमध्ये एका संगणकाची खरेदी केली जात असून विविध कार्यालयांमधून संगणकांची मागणी केली जात असली तरी प्रत्यक्षात अनेक कार्यालयांमध्ये संगणकावरील प्लास्टिक कव्हरही काढले गेले नाही. त्यामुळे अति महागडे संगणक महापालिकेत धुळखात पडण्यासाठी खरेदी केले जातात का असा सवाल उपस्थित होत असून त्यामुळे प्रत्येक कार्यालयांमधील संगणकांचे ऑडीट करण्याची वेळ आली आहे.

( हेही वाचा : New CDS Appointment: लष्कराच्या CDS पदी यांची नियुक्ती, केंद्र सरकारची घोषणा )

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध खात्यांच्या / विभागांच्या संगणकीकरणाचा भाग म्हणून इ ऑफीस (पेपरलेस ऑफीस), ऑटोडीसीआर (AutoDCR), एसएपी (SAP), बायोमेट्रिक हजेरी, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) इ. संगणक प्रणालीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विविध विभाग तसेच कार्यालयांसाठी संगणक, प्रिंटर आणि स्कॅनर खरेदी करून उपलब्ध करून दिले जातात. विविध विभाग तसेच कार्यालयांना देण्यात आलेल्या संगणकांपैकी बरेच संगणक 5 वर्षापेक्षा जुने व कालबाह्य झाल्याने आता महापालिकेने विभागांच्या मागणीनुसार ३ हजार नवीन संगणक खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मागवलेल्या निविदेमध्ये महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा एक टक्के अधिक दराने संगणक खरेदी केली जाणार आहे. डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्यूशन्स लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीकडून प्रति संगणक ८५ हजार ९०४ रुपये दराने २५ कोटी ४१ लाख रुपये किंमतीत तीन हजार संगणकांची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे ५० ते ६० हजार रुपयांमध्ये उपलब्ध होणाऱ्या संगणकांची किंमत ८५ हजारांमध्ये खरेदी केल्याने याबाबत सर्वांचाच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे ही निविदा आयटीमधील नामवंत संस्था असलेल्या पीडब्ल्यूसी या सल्लागार कंपनीच्या नियंत्रणाखाली काढण्यात आली आहे.

याबाबत महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे(आयटी) संचालक शरद उघडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तीन वर्षांच्या हमी कालावधीसह वार्षिक देखभालीच्या कंत्राटाचाही समावेश असल्याने ही किंमत जास्त दिसत असल्याचे म्हटले आहे. महापालिकेच्या विविध विभाग आणि कार्यालयांकडून सध्या ९ हजार संगणकांची मागणी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे होत आहे. त्यानुसार ३ हजार संगणकांची खरेदी केली जात आहे. तसेच कोविड काळांमध्ये काही विभागांच्या माध्यमातून परस्पर संगणक खरेदी केले होते. त्यातील काही संगणक धुळखात पडले असतील तर त्याची कल्पना नाही. परंतु प्रत्येक विभागांच्या मागणीनुसारच आयटी विभागाच्या माध्यमातून या संगणकांची खरेदी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वी या वाढीव दरांमध्ये संगणक खरेदी केल्यामुळे भाजपचे महापालिकेतील माजी पक्षनेते विनोद मिश्रा यांनी आक्षेप नोंदवला होता, यावर प्रशासनानेही खुलासा करत एका संगणकाची किंमत कशाप्रकारे वाढली गेली याचेही स्पष्टीकरण दिले होते.

संगणक कोणत्या पध्दतीचे आहेत

  • टाईप वन, लेटेस्ट १३/एएमडी, आठ जीबी रॅम, एक टीबी एचडीडी अधिक २५६ जीबी एसएसडी, २३.८ इंच डिसप्ले, वेबकॅम, वायफाय, ब्यूटुथ
  • प्रत्येकी किंमत : ८५ हजार ९०४ रुपये
  • तीन हजार संगणकांची एकूण खरेदी किंमत : २५ कोटी ४१ लाख रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.