गेले महिनाभर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेने मालक सावकारांची आणि मुलं खरेदी करून त्यांना राबवणाऱ्या धनगरांची पार दाणादाण उडवली आहे. या सावकारी वृत्तीच्या लोकांनी ठाणे, नाशिक, पालघर जिल्ह्यातील गरीब कातकरी मजुरांच्या दारिद्र्य आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या कोवळ्या बालकांना 500- 1000 रुपये देऊन अक्षरशः गुलाम म्हणून खरेदी केले होते. नाशिक- नगर जिल्ह्यातील या घटना ताज्या असतानाच जव्हार येथील मुलगी आणि भिवंडी तालुक्यातील 2 मुलांना श्रमजीवी संघटनेने मुक्त केले असून तीन वेगवेगळ्या गुन्ह्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
मनिषा नरेश भोये व काळू नरेश भोये या धारणहट्टी तालुका जव्हार येथील वय वर्षे 8 व 6 वर्षाच्या या मुली तळेगाव तालुका अकोले अर्थात अहमदनगर जिल्ह्यातील मेंढपाळ पुंडलिक कांदाडकर, देवराम कांदाडकर यांच्याकडे बाल मजुरी करत होत्या. मनिषा 3 वर्षांपासून तर काळू 1 वर्षांपासून बाल मजुरी करत होती. मनिषाला पुंडलिक याने 17 तारखेला शिरपामाळ जव्हार येथे सोडले. या घटनेची माहिती श्रमजीवीचे रवींद्र वाघ यांना मिळताच संघटनेचे कार्यकर्ते या प्रकरणात पुढे आले. मनिषाच्या वडिलांना कांदाडकर यांनी मनिषाच्याच्या मजुरीचे वर्षाला 12 हजार आणि एक मेंढी असे ठरवले होते. परंतु सुरवातीला 500 रुपयाव्यतिरिक्त काहीही दिले नाही. या मालकाने मनिषाला शेण भरणे , लेंड्या साफ करणे, दुध काढणे मेंढ्यांबरोबर फिरणे, पाणी आणणे, पाजणे तसेच, मेंढ्या व गाईंची सफाई करणे अशी अनेक कामे देऊन राबवून घेतले. याबाबत जव्हार पोलीस ठाण्यात श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. यात मनीषाची बहीण काळू नरेश भोये ही अद्यापही बेपत्ता असून तीचाही शोध सुरु आहे. श्रमजीवी संघटनेचे रवींद्र वाघ, संतोष धिंडा, सोमनाथ भोये, सीता घाटाळ इत्यादींनी या कुटुंबाला मदत तर केलीच पण त्यांना तातडीने रेशनकार्डही मिळवून दिले.
( हेही वाचा: चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती )
भिवंडीतील दोन बालकांचीही केली सुटका
भिवंडीतील वडवली खोताचा पाडा येथील सांगिता पवार या कातकरी महिलेने तक्रार दाखल केली आहे. राहुल नावाच्या आपल्या 17 वर्षीय मुलाला कर्जत तालुक्यातील ताजू येथील भिवा गोयकर या मेंढपाळाने वेठीबिगार म्हणून ठेवले असल्याचे तिने सांगितले. मालक भिवा राहुलला खूप त्रास द्यायचा तसेच शिवीगाळ करायचा. अखेर मालकाच्या जाचाला कंटाळून राहुल घरी परतला. श्रमजीवी संघटनेने लहान मुलांच्या बांधबिगारीला पुन्हा एकदा उजेडात आणल्याने संगीता पवार हिनेदेखील पुढे येत मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
Join Our WhatsApp Community