आता परशुराम घाटाकरता ‘या’ पर्यायी मार्गाला जिल्हा मार्गाचा दर्जा

परशुराम घाटाकरिता पर्याय ठरलेल्या आंबडस चिरणी लोटे या मार्गाला आता प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबतची घोषणा केली आहे. परशुराम घाटाकरिता आंबडस चिरणी लोटे मार्ग पर्यायी म्हणून उपयोगात आणण्यात येत आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेला हा मार्ग आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या मार्गाला प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे.

(हेही वाचा – आठ महिन्याच्या चिमुरड्याने गिळले नेलकटर, X-ray पाहून पालक हादरले आणि…)

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटरस्त्याचे आणि दुरुस्तीचे काम सध्या प्रगती पथावर आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होतो आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे खेड तालुक्यात या मार्गाचा पर्याय सार्वजनिक बांधकाम विभागाने खुला केला आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या आंबडस चिरणी लोटे या इतर जिल्हा मार्ग ४२ या रस्त्याची एकूण लांबी ७.२५० किलोमीटरची आहे. या रस्त्यावर आंबडस, चिरणी व लोटे अशी गावे येतात. हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हस्तांतरित होणार असल्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्ती लवकरच हाती घेणे शक्य होणार आहे.

हा रस्ता पनवेल पणजी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मधील परशुराम घाटाकडे जाणारा पर्यायी मार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पावसाळ्यात दरड कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक वारंवार बंद करावी लागते. दरम्यान, पर्यायी मार्गासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व जनतेच्या विनंतीवरून तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची शासकीय प्रक्रिया सुरू झाली असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here