घरी मांजर, कुत्रे पाळणाऱ्या कुटुंबांतील सदस्यांना वर्षांतून एकदा रेबीज लस बंधनकारक

150

ज्यांच्या घरी पाळीव श्वान किंवा मांजर आहेत, त्यांनी वर्षातून एकदा त्यांच्या पाळीव प्राण्यास रेबीज प्रतिबंधात्मक लस देणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी पाळीव श्वान, मांजर इत्यादी पाळीव प्राणी आहेत, त्यांनी त्यांच्या पशु वैद्यकांच्या सल्ल्यानुसार वर्षातून एकदा रेबीज प्रतिबंधात्मक लस न विसरता अवश्य घ्यायलाच हवी अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

( हेही वाचा : पुण्यात शाळेची बस आंबेगावात दरीत कोसळली; ७ विद्यार्थी गंभीर )

दरवर्षी जगभरात २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन पाळण्यात येतो. मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधांसह आरोग्य सुविधा देणाऱ्या महापालिकेच्या महानगरपालिकेच्या पशु वैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने दरवर्षी विविध कार्यक्रम राबविण्यात येत असतात. यावर्षीही विविध जनजागृती कार्यक्रमांसह मुंबईतील भटक्या श्वानांची रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा व उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात येणा-या या मोहिमेतंर्गत साधारणपणे ५ हजार भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच यासाठी मुंबईतील विविध प्राणिप्रेमी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक व पशु वैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण यांनी दिली आहे.

जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या पशु वैद्यकीय आरोग्य खात्याच्या पुढाकाराने आणि महापालिकेतील विविध प्राणिप्रेमी संस्थांच्या सहकार्याने भटक्या श्वानांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तर ज्यांच्या घरी पाळीव श्वान किंवा मांजर आहेत, त्यांनी वर्षातून एकदा त्यांच्या पाळीव प्राण्यास रेबीज प्रतिबंधात्मक लस देणे बंधनकारक आहे. तरी ज्यांच्या घरी पाळीव श्वान, मांजर इत्यादी पाळीव प्राणी आहेत, त्यांनी त्यांच्या पशु वैद्यकांच्या सल्ल्यानुसार वर्षातून एकदा रेबीज प्रतिबंधात्मक लस न विसरता अवश्य द्यावी, असेही डॉ. पठाण यांनी आवर्जून नमूद केले आहे.

जागतिक रेबीज दिन

मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या पुढाकाराने राबविण्यात येणारी भटक्या श्वानांची लसीकरण मोहीम ही येत्या ९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राबविण्याचे नियोजन आहे. या मोहिमेमध्ये २० पशुवैद्यक देखील सहभागी होणार आहेत. तसेच ज्या भटक्या श्वानांचे लसीकरण केले जाणार आहे, त्या श्वानांना विशिष्ट रंगाने चिन्हांकित केले जाणार आहे. ९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राबविण्यात येणारी पहिल्या टप्प्यातील ही मोहीम प्रायोगिक असून त्यानंतर निरंतर पद्धतीने ही मोहीम राबविण्याचे नियोजन प्रस्तावित आहे, असेही पशुवैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

दिनांक २८ सप्टेंबर रोजीच्या जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने अधिक माहिती देताना डॉ. पठाण यांनी सांगितले की, रेबीज हा संसर्गजन्य रोग आहे की, जो श्वान आणि मांजरींसारख्या संक्रमित प्राण्याने चावल्यानंतर किंवा ओरखडल्यानंतर होतो. जेव्हा रेबीज संसर्ग झालेल्या प्राण्याची लाळ, पीडिताच्या त्वचेच्या किंवा जखमांच्या थेट संपर्कात येते, तेव्हा तो प्रसारित होऊ शकतो. रेबीज हा १०० टक्के घातक आजार असला, तरी या आजारास १०० टक्के प्रतिबंध करता येतो. हा रोग देशातील मृत्यू आणि विकृतीच्या प्रमुख कारणांपैकी नाही, परंतु सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून हा रोग निश्चितपणे ओळखला जातो,असेही त्यांनी म्हटले आहे.

देशात दर ३० मिनिटांनी रेबीज संसर्गित मृत्यूची नोंद

उपलब्ध आकडेवारीनुसार आपल्या देशात दरवर्षी साधारणपणे सुमारे दीड कोटी (१५ दशलक्ष) लोकांना जनावरे चावतात. तर दरवर्षी या रोगाने मृत्यू पावणार्‍या लोकांची संख्या सुमारे २५ ते ३० हजारांच्या दरम्यान आहे. याबाबत ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणी श्वानांचा संबंध असतो, त्यातही भटक्या श्वानांची संख्या अधिक असते. या रोगाचा प्रादुर्भाव १.७ टक्के असल्याचा अंदाज आहे. देशात दर ३० मिनिटांनी रेबीज संसर्गित मृत्यूची नोंद होते. भटके श्वान व मानवांमध्ये केवळ आंशिक लसीकरण हा रोगाचा प्रमुख जोखीम घटक मानला जातो. या अनुषंगाने श्वानांचे संख्या नियंत्रण आणि श्वानांचे सक्तीचे लसीकरण यावर अधिकाधिक भर देणे गरजेचे आहे. तसेच याबाबत सार्वजनिक शिक्षण व जनजागृती करण्याबाबतही नियमित कार्यक्रम रोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.