आरेतील रॅडिओ कॉलर केलेल्या मादी बिबट्याची गोरेगाव भ्रमंती

136

आरेत ऑक्टोबर महिन्यात पकडलेल्या मादी बिबट्याला वनविभागाने रेडिओ कॉलरिंग करुन मुक्त सोडल्यानंतर या अडीच वर्षाच्या बिबट्याने रविवारी भल्या पहाटे तीन वाजता गोरेगावमधील गोकुळधाम गाठले. ऐन रात्रीच्यावेळी गोकुळधाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये गळ्यात काळा पट्टा असलेला बिबट्या दिसताच हा व्हिडिओ इमारतवासीयांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाला. बिबट्या दर्शनाने घाबरुन जाऊ नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे. हा परिसर आरे जंगलाला लागूनच असल्याने याआधीही तीनवेळा गोकुळधाम रहिवाशांना बिबट्या दर्शन झाले आहे.

बिबट्याला वनविभागाने ‘डेल्टा’ नाव दिले

अखेर सोमवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने ही मादी बिबट्या गोरेगावात पकडलेली सी ३३ ही अडीच वर्षांची मादी बिबट्या असल्याचे स्पष्ट केले. या बिबट्याला वनविभागाने ‘डेल्टा’ असे नाव दिले आहे. सी ३३ ही आरेत गेल्यावर्षी माणसांवर हल्ला करणा-या मादी बिबट्याची बहिण आहे. हल्लेखोर मादी बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंज-यात सी ३३ ऑक्टोबर महिन्यात अ़डकली होती. तिची रवानगी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात हल्लेखोर बिबट्याला (सी३२) पकडल्यानंतर तिच्याऐवजी अगोदर पिंज-यात अडकलेल्या तिच्या बहिणीला (सी३३) ला सोडण्याचा वनविभागाने निर्णय घेतला. बिबट्या पुनर्वसन केंद्रात महिनाभराहून अधिक काळ राहिल्यानंतर तिला सोडण्यापूर्वी तिच्यावर देखरेख व्हावी म्हणून रेडिओ कॉलरिंग केले गेले.

( हेही वाचा : ऐन कोरोनाकाळात वैद्यकीय रुग्णालयातील प्राध्यापकांचा एल्गार )

बिबट्याचा वावर असल्यास

  • रात्रीच्यावेळी संबंधित भागांत जाणे शक्यतो टाळा. काही कामानिमित्ताने घराबाहेर जायचे असल्यास गर्दीने मोठा आवाज करत जा
  • रात्रीच्यावेळी घराबाहेर असल्यास मोबाईलवर मोठ्याने गाणे लावा, तसेच हातात टॉर्च ठेवा
  • घरातील कच-याचे योग्य व्यवस्थापन करा
  • बिबट्याचा वावर असलेल्या भागांत जंगल परिसरात नैसर्गिक विधीसाठी जाणे टाळा

वनविभागाचे आवाहन

वनविभाग डेल्टा या रेडिओ कॉलरिंग केलेल्या मादी बिबट्यावर लक्ष ठेवून आहे. बिबट्या दर्शनामुळे घाबरुन जाऊ नका. वनविभागाची टीम संबंधित विभागात गस्त घालत आहे. स्थानिकांनीही बिबट्या अधिवासाजवळ नागरी वसाहत असल्यास आवश्यक सूचनांचे पालन करावे असे आवाहन बोरिवली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक आणि संचालक जी मल्लिकार्जून यांनी केले आहे.

( हेही वाचा : सर्वाधिक बछड्यांना जन्म देणाऱ्या प्रसिद्ध कॉलरवाली वाघिणीचा मृत्यू )

तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार

डेल्टा (सी३३) ही मादी बिबट्या मानवी वस्तीत माणसांचा संचार कमी झाल्यानंतरच फिरते, असे आतापर्यंतचे निरीक्षण आहे. डेल्टा नागरी वसाहतीतील भटके कुत्रे खाण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. असे, वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या साहाय्यक संशोधन आणि बिबट्या अभ्यासक निकीत सुर्वे यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.