बिबट्यांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेल्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोमवारी चौथ्या बिबटयाला रेडिओ कॉलरिंग केले गेले. ठाण्यातील येऊर जंगलातील दुस-या बिबट्याच्या गळ्याभोवती रेडिओ कॉलरिगं केले गेले. उद्यानतील वेगवेगळ्या बाजूला राहणा-या बिबट्यांना रेडिओ कॉलरिंग करण्याचे ठरलेले असताना येऊर परिसरातील दोन बिबट्यांना रेडिओ कॉलरिंग करण्याच्या निर्णयाबाबतीतील नेमके कारण सर्व्हेक्षणाअंती समजेल, अशी माहिती वनसंरक्षक व संचालक जी मल्लिकार्जून यांनी दिली.
येऊर क्रांती बिबट्यालाही केले रेडिओ कॉलरिंग
बिबट्यांचे राहणीमान, त्यांचा संचारमार्ग समजण्यासाठी बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन टप्प्यांत पाच बिबट्यांना रेडिओ कॉलरिगं करण्याचा निर्णय झाला. पहिल्या लॉकडाऊनपूर्वी सावित्री आणि महाराजा या मादी व नर बिबट्याला रेडिओ कॉलरिंग केले गेले. मात्र आर्थिक गणित जुळत नसल्याने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आरेतील सी ३३ ही जेरबंद केलेली मादी बिबट्या रेडिओ कॉलरिगं करुन सोडण्यात आली. सी ३३ ला डेल्टा असे नाव दिले गेले. नुकतीच डेल्टाने गोरेगावातील गोकुळधाम परिसराला मध्यरात्री परिसरात भेट दिली. मात्र माणसांची हालचाल पूर्ण बंद झाल्यानंतर भक्ष्यासाठी मानवी वस्तीजवळ येत असल्याची माहिती उद्यानातील बिबट्यांचा अभ्यास करणारे वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटीचे साहाय्यक संशोधक निकीत सुर्वे यांनी दिली. ठाण्यातील येऊर क्रांती या मादी बिबट्याला नुकतेच रेडिओ कॉलरिंग केले गेले. क्रांती ही येऊर परिसरातीलच असल्याने पुन्हा येऊर परिसरातील सहा वर्षांच्या बिबट्याला रेडिओ कॉलरिगं करुन मुक्त सोडण्यात आले.
ठाण्यातील येऊर परिसरातीलच दोन बिबट्यांना रेडिओ कॉलरिंग करण्याबाबतीतील कारण सर्व्हेक्षणातील अहवालात उलगडले जाईल. अजून एका बिबट्याला लवकरच रेडिओ कॉलरिंग केले जाईल. एकूण सहा बिबटे रेडिओ कॉलरिंग केले जात आहेत, असे बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक व संचालक जी मल्लिकार्जून यांनी सांगितले.
संशोधकाला मिळाला मान
७० व ८०च्या दशकात मुंबईतील बिबट्यांचा अभ्यास करणा-या डॉ जे डी डेनियल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ येऊरच्या बिबट्याला ‘जीवन’ असे नाव देण्यात आले. हा संपूर्ण रेडिओ कॉलरिंग प्रकल्प वनविभाग तसेच वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण होत आहे. या प्रकल्पाला वाइल्डलाइफ एसओएस या प्राणीप्रेमी संस्थेचीही मदत मिळत आहे. सोमवारी रेडिओ कॉलरिंगसाठी वाइल्डलाइफ एसओएसचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ निखील बनगर तसेच साहाय्यक डॉ रश्मि गोखले यांनी जीवन नावाच्या बिबट्याला बेशुद्ध केल्यानंतर त्याच्या गळ्याभोवती रेडिओ कॉलरिगं बसवण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.
(हेही वाचा – राज्यात १ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार महाविद्यालये…)
Join Our WhatsApp Community