स्वातंत्र्यवीर सावरकरांवर कायमंच विरोधकांकडून तथ्यहीन टीका करण्यात येत असल्याचे पहायला मिळत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी देखील नुकतीच सावरकरांवर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील अनेक वेळा सावरकरांना माफीवीर म्हणत निंदनीय आरोप केले आहेत. त्यामुळे सावरकरांवर अशी अर्थहीन टीका करणा-या नेत्यांनी स्वतः आजवर किती वेळा माफी मागितली आहे, याची माहिती समोर येत आहे. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनी आजवर अनेक वेळा माफी मागितली आहे.
केजरीवालांनी टेकले गुडघे
‘माफी मागायला मी काय सावरकर आहे का’, असे विधान नुकतेच अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. पण असे म्हणणा-या केजरीवाल यांनी आपल्यावरील कारवाईला घाबरुन अनेकदा माफी मागत गुडघे टेकले आहेत. केजरीवाल यांनी 2014 रोजी देशातील भ्रष्टाचा-यांची यादी जाहीर केली होती. या यादीत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही नाव घेतले होते. तेव्हा 2014 मध्ये गडकरी यांनी केजरीवाल यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. तेव्हा केजरीवाल यांनी याच खटल्याला घाबरून गडकरी यांची माफी मागत आपल्यावरील खटला मागे घेण्याची विनंती केली होती. तेव्हा गडकरी यांनी त्यांच्यावरील खटला मागे घेतला होता.
जेटलींकडे सादर केला माफीनामा
भारताचे दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांची देखील केजरीवाल यांनी माफी मागितली होती. दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडीत केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भ्रष्टाचार केल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते. तेव्हा जेटली यांनी देखील केजरीवाल यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. त्यावेळी केजरीवाल यांनी जेटलींना पत्र पाठवत त्यांची माफी मागितली होती. माझ्याकडून लावण्यात आलेले आरोप हे खोटे आहेत. त्यामुळे मी ते मागे घेत असल्याचे केजरीवाल यांनी जेटली यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
गांधींचे कातडी बचाओ धोरण
‘चौकीदार चोर है’, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. आपल्या याच विधानासाठी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली होती. राजकीय प्रचारादरम्यान माझ्याकडून हे विधान करण्यात आलं असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी माफी मागितली होती.
स्वतंत्र भारतात व्यक्तीस्वातंत्र्याचा दाखला देत या नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गुलामगिरीच्या अंधारात क्रांतीची मशाल घेतलेल्या सावरकरांना माफीवीर म्हणण्याचा या नेत्यांना काहीही अधिकार नाही. कारण आपल्यावरील कारवाईला घाबरुन जे माफी मागतात ते खरे माफीवीर आहेत, पण सावरकर हे केवळ आणि केवळ स्वातंत्र्यवीरच आहेत, असे सावरकररप्रेमींकडून सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community