लसीकरणावरुन राहुल गांधींनी केलं ट्वीट… नेटक-यांनी छेडले ट्विटर वॉर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींच्या निर्णयावर ट्वीट करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर मात्र ट्वीटक-यांनी त्यांच्या या ट्वीटला सडेतोड उत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जनतेशी संवाद साधताना काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये 21 जूनपासून देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला. पण मोदी सरकारला कायमच विरोध करणा-या विरोधकांनी मात्र, यावरुन सुद्धा विरोध करायला सुरुवात केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींच्या या निर्णयावर ट्वीट करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर मात्र ट्वीटक-यांनी त्यांच्या या ट्वीटला सडेतोड उत्तर देत, त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय आहे राहुल गांधींचे ट्वीट?

पंतप्रधान मोदी यांनी सर्वांसाठी मोफत लसीकरणाची घोषणा केल्यानंतर, राहुल गांधी यांनी ट्वीट करत एक प्रश्न विचारला.

जर सगळ्यांसाठी लसीकरण मोफत असेल, तर खाजगी रुग्णालये त्यासाठी दर का आकारत आहेत?

असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावरुन त्यांच्या ट्वीटला उत्तर देताना नेटक-यांनी ट्वीट वॉर छेडले.

काय आहेत नेटक-यांची उत्तरे?

राहुल गांधींच्या या प्रश्नाला उत्तर देताना नेटक-यांनी त्यांच्यावरच टीका केली. तुम्हाला परवडत नसेल तर तुम्ही मोफत लस घ्या, काही हरकत नाही, असे ट्वाट करत नेटक-यांनी त्यांचा समाचार घेतला. तसेच राहुल गांधी फक्त डाव्यांचे ट्वीट कॉपी पेस्ट करुन टाकत असतात, अशीही कमेंट त्यांना उत्तर देताना करण्यात आली आहे.

तसेच एक उलट प्रश्न राहुल गांधी यांनाच विचारण्यात आला आहे. यूपीए सरकारने मान्यता दिलेल्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार, जर सर्वांना मोफत शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे, तर आजही खासगी शाळांमध्ये भल्या मोठ्या फी का आकारल्या जातात? असाही एक खोचक प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

इतकंच नाही तर काँग्रेसशासित राज्यांमध्ये लसीकरणाच्या चाललेल्या बाजारावर देखील अनेकांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. राजस्थान सरकारने लस वाया घालवल्या, तर पंजाबात लसींचा काळा बाजार सुरू असल्याची टीका सुद्धा करण्यात आली आहे.

काय आहे केंद्र सरकारचा निर्णय?

21 जूनपासून सर्वांसाठी लसीकरण मोफत करण्यात आले असल्याचे सांगतानाच 75 टक्के लसी थेट केंद्र सरकार उत्पादकांकडून विकत घेऊन त्याचे वितरण सर्व राज्यांना करेल, तसेच खासगी रुग्णालये 25 टक्के लसी थेट उत्पादकांकडून खरेदी करुन लसीकरण सुरू ठेऊ शकतात, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालये सुद्धा लसींच्या निर्धारित किंमतीपेक्षा केवळ 150 रुपयेच जास्त सर्विस चार्जेस आकारू शकतात, असे देखील सांगण्यात आले आहे. यावर लक्ष ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची असेल, असे देखील केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मोदींनी केले आवाहन

सोमवारी देशातील जनतेशी संवाद साधताना, पंतप्रधान मोदी यांनी लसीकरणावरुन अफवा पसरवणा-यांपासून सावध राहा, असा इशारा भारतीयांना दिला आहे. २१ जूनपासून १८ वयोगटापुढील सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे. ज्यांना मोफत लस घ्यायची नसेल त्यांनाही खासगी रुग्णालयात जाऊन लस घेता येईल, त्यासाठी खासगी रुग्णालये २५ टक्के लसी उत्पादकांकडून खरेदी करू शकतात. लसीकरणाबाबत समाजात अनेकजण गैरसमज पसरवत आहे. ते सर्वसामान्य आणि भोळ्या भाबड्या लोकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. त्यांच्यापासून सुरक्षित राहा, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here