कैवल्यधाम ही निस्वार्थी भावनेने काम करणारी संस्था आहे. त्यामुळे सामन्यातला अतिसामान्य नागरिक देखील त्यांच्यासोबत सहजरित्या जोडला जाऊ शकतो. त्यामुळे केवळ योगा नव्हे, तर कैवल्यधामने पूर्ण केलेली ही मानवसेवेची १०० वर्षे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले. जगभरात योगदिवस साजरा होऊ लागल्यामुळे परदेशातील नागरिकांनाही योग विज्ञानाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे भारताने जगाला दिलेली योग ही एक महत्त्वाची भेट आहे, असे उद्गार महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी काढले.
योग विद्येचे प्रशिक्षण देणाऱ्या ‘कैवल्यधाम’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेने आपले शतक महोत्सवी वर्ष साजरे करत असताना ‘योगिक विज्ञान’ नावाचा माहितीपट भेटीला आणला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते या महितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री, कैवल्यधाम शताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष आणि ऋषिहूड विद्यापीठाचे कुलपती सुरेश प्रभू उपस्थित होते.
योगामागील विज्ञानाचा अभ्यास करून, योगाला सर्वसमावेशक पद्धतीने सर्वसामान्य लोकांपर्यंत रुजवणे हाच या माहितीपटामागचा उद्देश आहे. यामध्ये गेल्या १०० वर्षांतील योगामधील उत्क्रांती दर्शविली असून वैज्ञानिक प्रयोगाद्वारे प्रमाणीकरण करून योगाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आवश्यक बाबींचा सप्रमाण समावेश केला आहे. गेल्या शतकभरातील कैवल्यधामने केलेले योगाच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्य देखील या माहितीपटामध्ये दाखविण्यात आले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये महाराष्ट्रातील लोणावळा येथे वसलेल्या या संस्थेच्या उत्क्रांतीची मंत्रमुग्ध करणारी कहाणी यात पहायला मिळते.
योगामध्ये वैज्ञानिक पातळीवर संशोधन करणारी आणि जगातील पहिले योग महाविद्यालय स्थापन करणारी एकमेव संस्था होण्याचा मान लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेला मिळाला आहे. कैवल्यधामने त्याच्या संपूर्ण इतिहासात वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे शुद्ध पारंपारिक स्वरूपात योगाचा प्रसार केला आहे. माहितीपटाच्या केंद्रस्थानी कैवल्यधामचे संस्थापक स्वामी कुवलयानंद यांचे अधिष्ठान आहे, ज्यांना प्रेमाने योगी वैज्ञानिक म्हणून ओळखले जाते. स्वामी कुवलयानंद यांनीच योग चिकित्सा जगासमोर आणून योग क्षेत्रात क्रांती घडवून आणली. तसेच योगाचे उपचारात्मक फायदे लोकांसमोर आणले. अनेक वर्षांपासून कैवल्यधाम कॅन्सर केअर, जीन थेरपी, ऑटो-इम्यून डिसऑर्डर आणि त्याही पलीकडे अनेक रोगांच्या उपचारासाठी योगाचा उपयोग त्याच्या वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध केलेल्या भक्कम अशा संशोधनासह यशस्वीपणे करत आहे.
(हेही वाचा – Virat Kohli : विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ५००वा आंतरराष्ट्रीय सामना अन् ७६वे शतक)
कैवल्यधामच्या कार्याला सलाम – सुरेश प्रभू
विश्वाची निर्मिती झाल्यापासून आजतागायत अनेक गोष्टी नष्ट झाल्या. महाकाय म्हणवल्या जाणाऱ्या डायनासोरचे अस्तित्त्वही या जगातून नष्ट झाले. पण, माणूस ही एकमेव गोष्ट अशी आहे, जी संपली नाही. त्याचे कारण म्हणजे मानवाने अवलंबलेली नियोजनबद्ध जीवनपद्धती. योगा हा त्यातील महत्त्वाचा घटक आहे. कारण मानवाचे शरीर अंतर्बाह्य तंदुरुस्त ठेवण्याचे काम योगा करतो. कैवल्यधाम सारखी संस्था गेल्या १०० वर्षांपासून हे कार्य अविरतपणे करते आहे. त्यांच्या या कार्याला माझा सलाम.
माहितीपट सर्वसामान्यांसाठी का महत्त्वाचा?
- यावेळी बोलताना कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी म्हणाले, “हा माहितीपट संशोधन आणि शिक्षणाच्या सीमा ओलांडत योगाची सत्यता टिकवून ठेवण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवितो. आम्ही संस्थेचा शतक महोत्सवी टप्पा पार करत असताना, जगभरातील साधकांना आमच्या या सिनेमेटिक एक्सप्लोरेशनमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करतो. या समृद्ध वारशाचा आणि योगाचा प्रत्येक व्यक्ती आणि संपूर्ण समाजावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
- संस्थेचा समृद्ध वारसा जपताना, योगक्षेत्रातील त्याचे सखोल योगदान आणि मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात होत असलेला महत्त्वपूर्ण प्रयत्न याविषयी माहितीपट दर्शकांना आकर्षक प्रवासात घेऊन जातो. दरवर्षी, कैवल्यधामद्वारे जगभरातील १० हजाराहून अधिक व्यक्ती जीवनात सकारात्मक बदल होऊन प्रभावित होतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community