याआधीही मुंबईत झालेल्या घातपातांमागचे असे आहे रायगड कनेक्शन

94

गुरुवारी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे असलेल्या समुद्रकिना-यावर संशयास्पद बोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे या बोटीत तीन AK-47 रायफल्ससह बुलेट्स आढळून आल्यामुळे हा घातपाताचा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही बोट ओमानवरुन श्रीवर्धन येथे आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या संशयास्पद बोटीमुळे रायगड,मुंबईसह संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पण याआधीही मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या मागे सुद्धा रायगड कनेक्शन असल्याचे समोर येत आहे. याआधीही रायगडमधील समुद्रकिना-यावर स्फोटके उतरवण्यात आली आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे हे सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे.

घातपाताचे रायगड कनेक्शन

1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटावेळी देखील रायगडमधील याच श्रीवर्धनच्या समुद्रकिना-यावर आरडीएक्स उतरवण्यात आले होते. तसेच 26/11 चा मुंबई दहशतवादी हल्ला देखील समुद्रमार्गेच झाला होता. त्यामुळे या संशयास्पद बोटीची सुरक्षा यंत्रणांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, मुंबईसह राज्यातकाही ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडीचे आयोजन करण्यात आल्यामुळे ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एटीएसची तुकडी रवाना

दरम्यान, दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) एक तुकडी देखील या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हरिहरेश्वर येथे रवाना झाली आहे. यामागे दहशतवादी कनेक्शन तर नाही ना, याचा तपास एटीएसकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.