रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर समुद्रात शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या बोटीत तपास यंत्रणेला 3 एके 47 रायफल्स आणि अडीचशे जिवंत काडतुसे सापडली आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्याने राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सागरी पोलीस तसेच सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र राज्य दशतवादी पथकाने या मागे कुठलेही दहशतवादी कृत्य नसल्याचे सांगितले असून या बोटीची ओळख पटली आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी दिली.
गुरुवारी सकाळी श्रीवर्धन येथील हरीहरेश्वर येथून समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद स्पीड बोट येथील स्थानिक नागरिकांना आढळली. स्थानिक नागरिकांनी ही माहिती स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना दिली. पोलीसांनी ही संशयास्पद बोट ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्यात 3 एके 47 रायफल्स आणि अडीचशे जिवंत काडतुसे आढळली. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या एटीएसने ही बोट तपासली असता, ती ओमान सिक्युरिटी कंपनीची बोट असून या बोटीवर नेपच्यून सिक्युरिटी सर्व्हिसेस असे लिहलेले आढळून आले आहे. तपास यंत्रणेने या कंपनीशी संपर्क साधला असून ही बोट भरकटली होती, तिचा शोध घेण्यात येत होता अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
परंतु राज्यात सुरू असलेल्या सणासुदीच्या दिवसात घडलेल्या या घटनेमुळे राज्य सरकारने तत्काळ संपूर्ण राज्याला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. तसेच सागरी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
२६/११ ची पुरावृत्ती नको
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईत पुन्हा विघ्न नको म्हणून मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे. मुंबईतील सागरी किनारे सुरक्षित करण्यात आलेले आहेत. मात्र श्रीवर्धन या ठिकाणी घडलेल्या घटनेनंतर सागरी किनाऱ्यावरील सुरक्षा आणखी कडक करा असा इशारा देण्यात आला आहे.
( हेही वाचा: किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश, हायअलर्ट जारी – फडणवीस )
शस्त्रांनी भरलेल्या स्पीड बोटीची ओळख पटली आहे. ही बोट ओमान सिक्युरिटीची असून या बोटीवर असलेल्या नेपच्यून मेरिटाईम सिक्युरिटी सर्व्हिसेस असे लिहिण्यात आले होते. ओमान येथून ही स्पीड बोट भरकटत श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर आली होती. त्यात असलेला शस्त्रसाठा ओमान कंपनीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र सतर्क रहावे असे सुरक्षा यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community