न्यू टिळक नगरमधील रेल व्ह्यू इमारतीला अग्निशमन दलाची नोटीस

166

चेंबूर पूर्व येथील लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ न्यू टिळक नगर परिसरातील १३ मजली रेल व्ह्यू इमारतीला लागलेल्या आगीच्या दुघर्टनेनंतर या इमारतीला अग्निशमन दलाच्या वतीने नोटीस जारी करण्यात आलेली आहे. या १३ मजली इमारतीमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना यंत्रणा बसवण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात आगीच्या दुघर्टनेच्यावेळी त्या कार्यान्वित नसल्याने अग्निशमन दलाच्यावतीने या नोटीस जारी करण्यात आल्याचे म्हटले आहे. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी झालेली नसली तरी धुरामुळे श्वास गुदमरल्याने सहा रहिवाशांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते, परंतु या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आग प्रतिबंधक व सुरक्षा उपाययोजनांच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी ही  नोटीस जारी केल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

खिडकीच्या छज्जावर जीव वाचवण्यासाठी आसरा घेतला होता

कुर्ल्यातील नवीन टिळक नगरमधील रेल व्ह्यू या १३ मजली इमारतीच्या १२व्या मजल्यावर शनिवारी दुपारी आग लागण्याची घटना घडली होती. या दुघर्टनेमध्ये आगीच्या धुरामुळे रहिवाशांनी घरात तसेच खिडकीच्या छज्जावर जीव वाचवण्यासाठी आसरा घेतला होता. यातील काहींना स्थानिक रहिवाशांनी सुरक्षित बाहेर काढले होते, तर त्यानंतर काही घरांमध्ये अडकलेल्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. प्रत्यक्षात धुरामुळे रहिवाशांनी घाबरुन मिळेल तिथे आसरा घेतला. मात्र, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या रहिवाशांनी जिन्यावरुन किंवा लिफ्टमधून न घेता घरातच खिडकीकडे तोंड करून उभे राहिल्याने त्यांना याचा अधिक त्रास झाला नाही. अन्यथा धुराचा त्रास त्यांना अधिकप्रमाणात झाला असता. परंतु अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यानंतर या इमारतीतील आग प्रतिबंधक उपाययोजनांची यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या अग्निशमन दलाच्यावतीने या इमारतीला तात्काल नोटीस जारी करण्या आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी हेमंत परब यांनी, रेल व्ह्यू इमारतीमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे मान्य करत याप्रकरणी त्यांना नोटीस जारी करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहे. त्यानुसार ही नोटीस देण्याची कार्यवाही केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत संबंधितांकडून ही नोटीस  पाठवली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा दुकानांच्या पाट्या सात दिवसांमध्ये बदला : महापालिकेची दुकानदारांना अंतिम संधी अन्यथा होणार सोमवारपासून थेट कारवाई)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.