रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने घडवून आणली ४७७ मुलांची त्यांच्या पालकांशी भेट

ही कामगिरी मागील सात महिन्यांत करण्यात आली आहे.

138

घरातून पळून आलेले, परराज्यातून नशीब आजमावण्यासाठी मुंबईत येऊन बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेऊन, ४७७ मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची कामगिरी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स(आरपीएफ)ने केली आहे. यामध्ये ३१० मुले आणि १६७ मुलींचा समावेश आहे. ही कामगिरी मागील सात महिन्यांत करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्लॅटफॉर्मवर राहत होती मुले

मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या मुला-मुलींना चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने कारवाई करत, त्यांच्या नातेवाईकांची भेट घडवून आणल्याचे अधिका-यांनी सांगितले. त्यापैकी अनेक मुले-मुली भांडण किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या किंवा ग्लॅमरच्या शोधात, त्यांच्या कुटुंबियांना न कळवता रेल्वे स्थानकावर आली होती. प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना ही मुले प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वे स्थानकांजवळ किंवा कधीकधी गाड्यांमध्येही फिरताना आढळून आली होती.

(हेही वाचाः दहावी शिकलेले बनले डॉक्टर…चक्क कोरोनाबाधितांवर केले उपचार!)

मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्यासाठी आली तरुणी

यापैकी एका प्रकरणात २४ जुलै रोजी साधारण रात्री ११ वाजता कर्तव्यावर असणारे तिकीट परीक्षक(टीसी) नरेंद्र मिश्रा यांना एक १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी कल्याण ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान ट्रेनमधून एकटी प्रवास करताना आढळली. लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचल्यावर, टीसीने तिला ड्युटीवर असलेल्या महिला आरपीएफ सुश्री बी.पाटीदार आणि चाईल्डलाइन संस्थेच्या सुश्री शारदा कांबळे यांच्याकडे सोपवले. चाइल्डलाइन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आरपीएफ उपनिरीक्षक बबलू कुमार यांनी तिची चौकशी केली असता, तिने तिचे नाव शीतल(नाव बदलले आहे) असल्याचे सांगितले. ती बिहारच्या पाटणा येथे राहत असून, मुंबईत मॉडेलिंग/अभिनयामध्ये करिअर करण्यासाठी कोणालाही न सांगता घरातून पळून आली असल्याचेही तिने सांगितले. पुढील कारवाईसाठी चाइल्डलाइन कर्मचारी सुश्री शारदा कांबळे आणि महिला आरपीएफ कॉन्स्टेबल पूनम तिवारी यांनी या मुलीला बालसुधार गृह, डोंगरी यांच्याकडे सुपूर्द केले.

(हेही वाचाः चक्क खोट्या नोटा देऊन फसवणुकीपासून वाचला)

आईने फटकारले म्हणून आली पळून

दुसऱ्या एका घटनेत, मेहबूबनगर जिल्ह्यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईने तिला फटकारल्या नंतर घरातून पळून निजामुद्दीन-पुणे यशवंतपूर एक्सप्रेसने पुण्यात आली. आरपीएफ कॉन्स्टेबल शशिकांत जाधव आणि महिला कॉन्स्टेबल पी. श्रीवास यांना १४ जुलै रोजी हडपसर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर ती सापडली. चौकशी केल्यावर मुलीने तिचे नाव गीतांजली (नाव बदलले) उघड केले. ती फक्त तेलगू बोलू शकते. पोलिसांनी तिने दिलेल्या नंबरवर तिच्या काकांशी संपर्क साधला. त्यानंतर, आरपीएफ कॉन्स्टेबल जाधव आणि लेडी कॉन्स्टेबल पी. श्रीवास यांनी पुढील कारवाईसाठी मुलीला साथी एनजीओकडे सोपवले.

मध्य रेल्वेचे उत्तम कार्य

मध्य रेल्वे पळून गेलेल्या मुलांशी संपर्क साधून, त्यांच्या समस्या समजून घेऊन आणि त्यांच्या कुटुंबासोबत जाण्यासाठी समुपदेशन करुन सामाजिक जबाबदारीची भूमिका बजावते, असे रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले. लाहोटी यांनी आरपीएफ आणि फ्रंटलाईन स्टाफचे कौतुक केले जे अशा प्रकरणांतील गांभीर्य ओळखून आणि समुपदेशक म्हणून त्वरित कारवाई करुन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

(हेही वाचाः हर्षद मेहताच्या ‘त्या’ सहका-याला अखेर अटक…कोण आहे तो?)

मध्य रेल्वेवर जानेवारी ते जुलै २०२१ पर्यंत बचावलेल्या मुलांचे विभागवार विभाजन-

मुंबई विभाग १६६ मुले (१०४ मुले आणि ६२ मुली).
भुसावळ विभाग ७० मुले (३९ मुले आणि ३१ मुली).
नागपूर विभाग ४० मुले (२२ मुले आणि १८ मुली).
पुणे विभाग १७१ मुले (१३० मुले आणि ४१ मुली).
सोलापूर विभाग ३० मुले (१५ मुले आणि १५ मुली).

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.