नाना शंकरशेठ यांच्या जन्मभूमीत १६९ वर्षांनंतरही पोहोचलेली नाही रेल्वेसेवा

81

सध्या नाशिक पुणे रेल्वेचे काम जोरात सुरु आहे असे कळते. ते योग्यच आहे. ती खूप वर्षांपासूनची मागणी आत पूर्ण होण्याची अशा आहे. असे अनेक उपयुक्त प्रास्तवित मार्ग महाराष्ट्रात होणे अपेक्षित आहे. बीड सारख्या जिल्ह्यात तर ही मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे पण दिल्लीमधील रेल्वे मंडळाचे अधिकारी आणि रेल्वेमंत्री यांचे प्राधान्य त्याकडे नाही. या लेखमालेच्या अगदी सुरवातीला मी नाना शंकरशेठ यांच्या मुरबाड गावाचा उल्लेख केला होता, त्याची दुर्दैवी कहाणी थोडक्यात.

कल्याण ते अहमदनगर व्हाया मुरबाड-माळशेजघाट रेल्वेमार्गाचे रखडलेपण अनास्थेपणाचे उदाहरण

भारतीय रेल्वे ही सार्वजनिक वाहतूक सेवेचे जगातील सर्वात मोठे उदाहरण आहे. अतिशय विस्तारित असलेले हे रेल्वेचे जाळे भारतातील एका टोकाच्या प्रदेशातील जनतेला दुसऱ्या टोकावरील प्रदेशाशी अतिशय कमी खर्चात आणि कमी वेळेत जोडते. याशिवाय देशातील कोणत्याही आपत्ती व युद्धसदृश्य आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडते या बदल दुमत नाही. भारतीय रेल्वेची ही ओळख निश्चितच कौतुकास्पद आहे.

भारतातील पहिली प्रवासी रेल्वे मुंबई ते ठाणे अशी धावली त्या गोष्टीला आता १६९ वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षात खूपच बरेवाईट बदल झालेले आहेत. या वर्षात जी जी केंद्र सरकारे सत्तेत होती त्यातील रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेला भारताची अखंड सेवा मानून सर्वच ठिकाणांच्या आवश्यक सेवांचा विस्तार विचार करण्याचे उदाहरण अपवादात्मकच. त्या ऐवजी प्रत्येकाने आपापल्या मतदारक्षेत्रातील जनतेला फायदा व पर्यायाने लोकप्रिय होण्याचा विचार केला. त्यामुळे जशी पायभूत सुविधेत वाढ झाली त्याच प्रमाणात यंत्रणा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी ठिकठिकाणच्या प्रशासनिक आणि कर्मचारी मनुष्यबळाची वाढ झाली. याचा एक परिणाम ही पायाभूत सेवा एक ‘आवश्यक पांढरा हत्ती’ बनून राहिली व त्याच्यावरील अनावश्यक खर्चाचा आकडाही दिवसेंदिवस फुगत राहिला. सेवा तोट्यात जाणे अपरिहार्यच होते आणि मग पर्यायाने या सेवा यंत्रणेचे कालानुरूप खाजगीकरण होणे हे ही अपरिहार्यच.

या सर्व घडामोडीत ज्या प्रदेशात रेल्वे सेवा विस्तारविकास होणे गरजेचे होते असे अनेक प्रकल्प केवळ अनेक वर्षांच्या सरकारी अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या अनास्थेमुळे दुर्लक्षामुळे रखडले. रेल्वे सेवा आणि प्रदेशाचा विकास हे उदाहरण आपण अनेक ठिकाणी पहिले आहे. कोकण रेल्वे हे तर याचे ठळठळीत उदाहरण आहे. पण हे सर्व पुन्हा एकदा आपल्या समोर मांडण्याचे कारण ज्या पहिल्या प्रवासी रेल्वेतून ज्या २५ प्रवाश्यांनी पहिला प्रवास केला त्यातील भारतीय प्रवासी आणि त्या काळाच्या मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक जडणघडणीसाठी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात आपली अमाप संपत्ती दान केली, ज्यांना मुंबईचे ‘नाना’ म्हणून ओळखले जाते, ज्यांची २१८वी जयंती नुकतीच १० फेब्रुवारी २०२१ रोजी आपण साजरी (?) केली, ज्यांचे नाव पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल या उपनगरीय स्थानकाला देण्याचे प्रस्तावित आहे त्या जगन्नाथ शंकरशेठ मिरकुटे यांच्या ठाणे जिल्ह्यातील, मुरबाड तालुक्यातील जन्मभूमी गावात आज १६९ वर्षांनंतर अद्यापही रेल्वेसेवा पोहोचलेली नाही. हे फारच दुःखद आणि दुर्दैवी वास्तव आहे.

कल्याण ते अहमदनगर व्हाया मुरबाड-माळशेजघाट या रेल्वेमार्गाचे इंग्रज राजवटीत भोर घाट, कसारा घाट यानंतर ‘थर्ड घाट रेल्वे प्रोजेक्ट’ म्हणून सर्वेक्षण झाले होते. पण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण यांना मुंबईशी जोडणारा हा रेल्वेमार्ग त्याकाळी स्वातंत्र्यसैनिकांना उपकारक ठरेल, म्हणून ब्रिटिशांनी त्याकडे दुर्लक्ष केले. स्वातंत्र्योत्तर काळात १९५०, १९७३, २०००, २००६, २०१०,२०१४, २०१९ असे अनेकदा या मार्गाचे सर्वेक्षण झाले. २०१० मध्ये या रेल्वेमार्गाचा पिंकबुकमध्ये म्हणजे प्राधान्यक्रमात समावेश झाल्याचे समजते तर २०१४ चे सर्वेक्षण हे तर केवळ कागदोपत्री खटाटोप होता. यातील वर्षांचे खंड पाहता या भागातील रेल्वे प्रवासी, शेतकरी व मालवाहतूकदार यांनी सातत्त्याने पाठपुरावा करूनही ७१ वर्षे लोटली तरी अद्याप या रेल्वे मार्गाला काहीच गती मिळालेली नाही. ज्या मधू दंडवते यांच्या सातत्त्यपूर्ण प्रयत्नांमुळे कोकण रेल्वे प्रत्यक्षात आली ते म्हणाले होते, ‘देअर इज विल, देअर इज रेल्वे, देअर इज नो विल देअर इज ओन्ली सर्वे’ त्याचाच दुर्दैवी प्रत्यय येत आहे. २०१४ साली झालेल्या सर्वे मध्ये मूळ कल्याण-नगर या २४० किमीच्या मार्गाला ६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता तर २०१९ साली झालेल्या मूळ मार्गातील एका छोट्या कल्याण ते मुरबाड ह्या २८ किमी मार्गाचाच खर्च सुमारे ७२६ कोटी एव्हढा वाढल्याचे दिसत आहे. ह्या नव्या सर्वेनुसार हा मार्ग टिटवाळा ऐवजी कल्याण-अंबरनाथ-मुरबाड असा प्रस्तावित केला आहे.

सध्याच्या सरकारने रेल्वेच्या खाजगीकरणाला गती देण्याचे निश्चित केले असूनही त्याचे बरे वाईट परिणाम येणार काळ दाखवेलच. कोविड संकट काळातही रेल्वेने प्रवासी सेवा मर्यादित करून मालवाहतूक करण्याला प्राधान्य दिले, त्याचा परिणाम ‘किसान रेल’ सारख्या शेतकऱ्यांना शेतमालविक्री साठी सहज उपयोगी पडणाऱ्या पर्यायात झाला हे उदाहरण तर अगदी अलीकडचेच आहे. मग कल्याण आणि नगर या जिल्ह्यांना जोडणाऱ्या या मार्गामुळे या पट्ट्यातील प्रवासी सेवेबरोबरच शेतकरी, व्यापार-उद्योग, पर्यटन, मालवाहतूक इत्यादी सर्वांना होऊन उत्पादित केलेला माल थेट मुंबई-पुणे-नाशिकच्या बाजारपेठेत त्वरित व कमी खर्चात पोहोंचवणे शक्य आहे. कल्याणपासून मुरबाड, जुन्नर, पारनेर, नगर या अविकसित, आदिवासी आणि दुष्काळी पट्ट्यातून जाणारा हा रेल्वेमार्ग अहमदनगर-बीड-परळी या बांधकाम चालू असलेल्या रेल्वेमार्गाला जोडला जाऊ शकतो. परळी ते विशाखापट्टणम आणि परळी ते नांदेड ते नागपूर असे रेल्वेमार्ग सध्या कार्यरत आहेतच. म्हणजेच देशाच्या पूर्व किनारपट्टीवर असणारे विशाखापट्टणम आणि देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर असणारी महामुंबई यांना थेट जोडणारा हा रेल्वेमार्ग होईल. आणि प्रसंग पडलाच तर देशाच्या पूर्व-पश्चिम किनारपट्टीवर एकाचवेळी सैन्य आणि रसद पोहोचवण्यासाठी कल्याण ते अहमदनगर रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वाचा आणि आर्थिक दृष्टया फायद्याचा ठरणार आहे हे निश्चित.

पुणे-नाशिक रेल्वे मार्ग जसा लोक प्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे ‘महारेल’ मार्फत मार्गी लावला जाऊ शकतो तसाच हा कल्याण-नगर मार्ग सुद्धा प्रत्यक्ष अस्तित्वात येऊ शकतो. गरज आहे ती जनतेबरोबरच या प्रदेशातील सर्वपक्षीय, प्रभावी लोकप्रतिनिधी, ३ खासदार, १८ आमदार आणि माध्यमांची या रेल्वे मार्गाच्या मागणीच्या बाजूने उभे राहण्याची.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.