यंदा पाऊस चांगला परंतु काही भागात अनियमित पडेल!

118

वेधशाळा अस्तित्त्वात येण्यापूर्वीपासून आपल्याकडील पंचांगात पावसाचा अंदाज दिलेला असतो. हा अंदाज प्राचीनकाळी सांगितलेल्या नियमांवर आधारित असतो. यावरून यावर्षी पाऊस चांगला परंतु काही भागात अनियमित पाऊस पडेल असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. हे अंदाज हे ठोकताळे असतात म्हणून शेतकरीवर्गाने केवळ पंचांगातील पर्जन्य अंदाजावर अवलंबून न राहता आधुनिक वेघशाळा नवीन तंत्रज्ञानाद्वारे उपग्रहामार्फत घेतलेली ढगांची छायाचित्रे, हवेचा दाब, वा-याची दिशा इत्यादी गोष्टीद्वारे जे पर्जन्य अंदाज प्रसिद्ध करतात त्यानुसार आपले शेतकामाचे वेळापत्रक तयार करावे असे स्पष्ट मत दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.

( हेही वाचा : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा २८ मे पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा!)

नक्षत्र व वाहने पुढील प्रमाणे

यावर्षीचा सूर्याचा पर्जन्य नक्षत्र प्रवेश व वाहने पुढील प्रमाणे आहेत. घोडा वाहन असता डोंगर भागात पाऊस चांगला पडतो. कोल्हा व मेंढा वाहन असता पाऊस पडत नाही. मोर, गाढव आणि उंदीर वाहन असता अल्पवृष्टी होते. बेडूक, म्हैस व हत्ती वाहन असता खूप पर्जन्यवृष्टी होते असे सांगण्यात आले आहे. वाहने ठरविण्याचा नियमही सोमण यांनी सांगितला. “ सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करील त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्र नक्षत्रापर्यंत नक्षत्र संख्या मोजावी. या संख्येस ९ ने भागावे. शून्य बाकी राहिली तर हत्ती, १ घोडा, २ कोल्हा, ३ बेडूक, ४ मेंढा, ५ मोर, ६ उंदीर, ७ म्हैस आणि ८ बाकी राहिली तर गाढव वाहने समजली जातात.” तसेच शेतकरीबंधूनी अनुभवांप्रमाणे पर्जन्य नक्षत्रांना दिलेली गमतीशीर नावेही दा. कृ.सोमण यांनी दिली आहेत.

१) मृग– बुधवार, ८ जून दुपारी १२.३७ वाहन गाढव.
२) आर्द्रा – बुधवार २२ जून सकाळी ११.४२ वाहन मेंढा.
३) पुनर्वसू ( तरणा पाऊस )- बुधवार ६ जुलै सकाळी ११.१० वाहन उंदीर.
४) पुष्य ( म्हातारा पाऊस ) – बुधवार २० जुलै सकाळी १०.४८ वाहन कोल्हा.
५) आश्लेषा ( आसळकाचा पाऊस ) – बुधवार ३ ॲागस्ट सकाळी ९.३७ वाहन मोर.
६) मघा ( सासूंचा पाऊस ) – बुधवार १७ ॲागस्ट सकाळी ७.२२ वाहन घोडा.
७) पूर्वा फाल्गुनी ( सूनांचा पाऊस ) – मंगळवार ३० ॲागस्ट उत्तररात्री ३.१७ वाहन मेंढा.
८) उत्तरा फाल्गुनी ( रब्बीचा पाऊस ) – मंगळवार १३ सप्टेंबर रात्री ९.१४ वाहन गाढव.
९) हस्त ( हत्तीचा पाऊस ) – मंगळवार २७ सप्टेंबर दुपारी १२.४३ वाहन कोल्हा.
१०) चित्रा – सोमवार १० ॲाक्टोबर उत्तररात्री १.४५ वाहन उंदीर.
११) स्वाती– सोमवार २४ ॲाक्टोबर दुपारी १२.१८ वाहन गाढव.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.