‘असानी’च्या प्रभावाने राज्यात बुधवारी पावसाची शक्यता

आंध्रप्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीच्या जवळून वाहणा-या ‘असानी’ या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात बुधवारी (११ मे) पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. हे वादळ किनारपट्टीवर धडकले नसले तरीही आंध्रप्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर पावसाचा सतत मारा सुरु आहे. बुधवारी सकाळी वादळाची तीव्रता अजून कमी होईल, असे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : यंदाच्या पावसाळ्यात १७ दिवस भरतीचे )

बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा तसेच सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूरातही पाऊस होईल. मात्र पावसाचा जोर फारसा नसेल. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरमध्ये पावसाचे शिडकावे होतील, असाही अंदाज आहे. असानी वादळातील बाष्पाच्या प्रभावाने राज्यात दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गात शुक्रपारपर्यंत पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाच्या प्रभावापासून विदर्भ दूर असल्याने उष्णतेच्या लाटेपासून विदर्भवासीयांची १२ मेपर्यंत सुटका होणे शक्य नाही.

मे महिन्यातील तापमानाचा रेकॉर्ड

मंगळवारीही विदर्भातील अकोला येथे राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमान नोंदवले गेले. अकोल्यातील कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जळगावात कमाल तापमानाने वेगवेगळे रॅकोर्ड्स नोंदवले आहेत. जळगावात २०१८ नंतरचे सर्वात कमाल तापमानाची नोंद मंगळवारी झाली. कमाल तापमानाने थेट ४४.५ अंश सेल्सिअसवर मजल मारली. औरंगाबाद येथे २०२१ नंतरचे मे महिन्यातील सर्वात जास्त कमाल तापमान नोंदवले गेले. मंगळवारच्या कमाल तापमानाच्या नोंदीत औरंगाबाद येथे ४२.८ अंश सेल्सिअस तापमान होते. परभणीत ४३.८ अंश सेल्सिअसवर कमाल तापमान होते. परभणीतील २०२० नंतरचे मे महिन्यातील सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद मंगळवारी झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here