राजभवनात टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरी करणाऱ्या ५१ वर्षीय कर्मचाऱ्याने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना सोमवारी दुपारी घडली, आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. तरी घरगुती कारणावरून ही आत्महत्या केली असावी अशी शक्यता मलबार हिल पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शुभदा मोरे यांनी दिली.
समुद्रात उडी मारत आत्महत्या
कमलेश जाधव (५१) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे, कमलेश जाधव हे राजभवनात टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरीला होते. राजभवनातील कर्मचारी निवास या ठिकाणी कमलेश हे कुटुंबासह राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमलेश यांना दारूचे व्यसन होते, मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. सोमवारी दुपारी १२:३० च्या सुमारास कमलेश हे घरातून बाहेर पडले होते, त्यानंतर त्यांनी मोठा मुलगा मयूर याच्या मोबाईलवर मी आत्महत्या करीत असून माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये असा मेसेज केला होता.
( हेही वाचा : पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतरही रेल्वे स्थानकांवरील फेरीवाल्यांचा विळखा आवळलेलाच)
काही महिन्यांपूर्वी देखील कमलेश यांनी ग्रॅंटरोड रेल्वे स्थानकावरून मुलाला असाच मेसेज केला होता, मात्र कमलेश हे रेल्वे स्थानकांवर बसलेले आढळून आल्यामुळे यावेळी देखील वडिलांनी तसाच मेसेज केला असेल असे समजून मुलाने हा मेसेज गंभीरतेने घेतला नाही. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कमलेश यांनी मलबार हिल राज भवनाकडे जाणाऱ्या मार्गावरील दर्शनी गॅलरी पासून काही अंतरावर असलेल्या समुद्राच्या कठड्यावरून समुद्रात उडी घेतली, हा प्रकार बघणाऱ्या तेथील तीन तरुणांनी समुद्रात उडी घेऊन कमलेश यांना पाण्याबाहेर काढून नजीकच्या एलिझाबेथ रुग्णालयात आणले मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी कमलेश जाधव यांच्या गळ्यातील ओळखपत्रावरून ओळख पटवून या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली असून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी अपमृत्युची नोंद करण्यात आली असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community