‘हिंदू (Hindu) आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई’ च्या वतीने गोरेगाव (प.) येथील लक्ष्मी पार्क येथील महाराणी अहिल्याबाई होळकर मैदानावर ९ जानेवारीपासून भव्य सेवा मेळ्याचा प्रारंभ झाला. या ठिकाणी विविध आध्यात्मिक. राष्ट्र आणि सेवाभावी संस्थांची प्रदर्शने येथे उपलब्ध असून सनातन संस्था, हिंदु (Hindu) जनजागृती समिती आणि सनातन प्रभातच्या प्रदर्शनांचा सुद्धा येथे आरंभ झाला. याप्रसंगी सनातन संस्थेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाहक राजेंद्र वराडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी राजेंद्र वराडकर यांनी येथील भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेला ओवाळून आणि श्रीफळ वाढवून स्टॉलचे उदघाटन केले. याप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक बळवंत पाठक, सनातन संस्थेचे महेश पेडणेकर यांच्यासह संस्थेचे साधक उपस्थित होते. हे प्रदर्शन १२ जानेवारीपर्यंत उपलब्ध असणार असून जिज्ञासु आणि धर्मप्रेमींनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्था आणि हिंदू (Hindu) जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंदूंना जागृत करण्याचे काम हा मेळा करणार – स्वामी गोविंद देव गिरी महाराज
हिंदू (Hindu) आध्यात्मिक आणि सेवा मेळ्याच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी मार्गदर्शन केले. स्वामी गोविंद देव गिरी महाराज मार्गदर्शन करताना म्हणाले. ‘आपल्या भारतीय हिंदू (Hindu) जीवनपध्दतीत साधनेला सर्वोच्च स्थान आहे आणि त्यातही शास्त्रांनी, वेदांनी, भगवदगीतेने सेवा करण्यास अनन्य महत्व दिले आहे. असेच सेवा कार्य ‘ हिंदू आध्यात्मिक आणि सेवा मेळा’ यांनी येथे आरंभिले आहे. हिंदूंना जागृत करण्याचे काम हा मेळा आहे. आपल्या पुढील पिढीला आणि हिंदू बांधवांना जागृत करण्याचे काम या मेळ्याच्या माध्यमांतून विविध संस्था करत आहेत. हे मेळे एक छोट्या कुंभमेळ्याप्रमाणेच आहेत. आपला देश आणि धर्मावर संकटे येत राहतील मात्र भारतमातेला जगात सर्वोच्च स्थानावर नेण्याचे कार्य आपण सर्वांनी मिळून करायचे आहे, असे स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले. यावेळी व्यापीठावर विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community