Rajini the Jailer : रजनीकांतच्या नवीन सिनेमाने पहिल्याच दिवशी सगळे विक्रम हवेत उडवले

आगाऊ बुकिंग पाहिलं तर सिनेमा आणखी विक्रम घडवण्याच्या तयारीत आहे

211
Rajini the Jailer : रजनीकांतच्या नवीन सिनेमाने पहिल्याच दिवशी सगळे विक्रम हवेत उडवले
Rajini the Jailer : रजनीकांतच्या नवीन सिनेमाने पहिल्याच दिवशी सगळे विक्रम हवेत उडवले
  • ऋजुता लुकतुके

प्रदर्शनाच्या फक्त पहिल्या दिवशी जेलर सिनेमाने ४४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांतील आगाऊ बुकिंग पाहिलं तर सिनेमा आणखी विक्रम घडवण्याच्या तयारीत आहे. तामिळ सुपरस्टार रजनीकांत चमत्कार करत नाही. तर तो स्वत:च एक जिता जागता चमत्कार आहे. बाकीचे सिनेमे सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित होतात. रजनीकांतच्या सिनेमाच्या दिवशी दक्षिणेत सुट्टी जाहीर केली जाते. रजनी द जेलर या सिनेमाच्या वेळी तसं झालंही. चेन्नई, बंगळुरू आणि इतरही शहरांत लोकांना गुरुवारी सुट्टी मिळाली होती. आणि जे नशीबवान होते त्यांना त्या दिवशी तिकीट मिळालंही.

कारण, आगाऊ बुकिंग काही काळ आधीच झालेलं होतं. या सगळ्याचा दृश्य परिणाम सिनेमाच्या पहिल्या दिवसांची बॉक्स ऑफिस कमाई विक्रमी ४४ कोटी रुपये अशी आहे. मणीरत्नमच्या पोनियिन सेल्वन २ चा ३२ कोटींच्या कमाईचा विक्रम जेलरने मोडला आहे. पोनियिन सेल्वनमध्ये ऐश्वर्या राय आकर्षण बिंदू होती. इथं होता रजनीकांत. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचे आकडे आले तेव्हाच जेलरला चांगलं ओपनिंग मिळणार हे निश्चित झालं होतं. आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय. दिग्दर्शक नेलसन यांचा हा सिनेमा तांत्रिक आणि कथेच्या निकषांवर सगळ्यांच्या पसंतीस उतरला आहे. रजनीकांत यांच्या जोडीला सिनेमात रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि योगी बाबू असे कलाकार आहेत. तर मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांनीही छोट्या भूमिका वठवल्या आहेत.

(हेही वाचा – ‘माझा टॅक्सी ड्रायव्हर नोकरीपेक्षा गाडी चालवून जास्त पैसे मिळवतो,’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल)

चित्रपटाचं कथानक जेलर टायगर मुथुवेल पांडियन यांच्याभोवती फिरतं. एका कुख्यात टोळीतल्या लोकांना त्याच्या म्होरक्याची तुरुंगातून सुटका करायची आहे. आणि या खतरनाक टोळीची गाठ मुथुवेलच्या भूमिकेतील रजनीकांतशी आहे. चित्रपटात जोरदार ॲक्शनबरोबरच नृत्य आणि संगीतही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रजनीकांत यांचा तामिळ चित्रपट सृष्टीतील कमबॅक म्हणून या सिनेमाकडे पाहिलं जात आहे. यापूर्वी २०२१ मध्ये त्यांनी शेवटचा सिनेमा केला होता. आता चित्रपटाला मिळालेलं दमदार ओपनिंग. आणि पुढेही काही दिवसांचं झालेलं आगाऊ बुकिंग हा रजनीकांत यांच्या नावाचा महिमा आहे असं ट्रेड पंडित सांगतात. पीव्हीआर आयनॉक्सचे गौतम दत्ता यांनी चित्रपटाच्या यशाचं श्रेय सर्वसामान्य लोकांना भावणाऱ्या कथेला आणि स्पेशल इफेक्ट्सना दिलं आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्स चित्रपटगृहांमध्ये ५५० ठिकाणी या चित्रपटाने २००० खेळ पहिल्या दिवशी झाले. आणि २,००,००० तिकिटं विकली गेली, अशी माहितीही गौतम यांनी पीटीआय वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.