-
जयेश शत्रुघ्न मेस्त्री
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र मोदी आणि फडणविसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची आणखी एक संधी मिळाल्याने विरोधक या घटनेने खुश झाले आहेत. त्यात पुतळा उभारणारी व्यक्ती आपटे आडनावाची असल्यामुळे त्यांच्या हातात आयते कोलित मिळाले आहे. सर्वप्रथम वाचकांना मी एका गोष्टीचं स्पष्टीकरण देऊ इच्छितो की घटलेली घटना दुर्दैवी आहे. ही घटना टाळता आली असती. तांत्रिक बिघाड आणि हलगर्जीपणामुळे हे घडलेलं आहे. त्याची सखोल चौकशी होईलच. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाचं दैवत आहे. त्यामुळे त्यांचा पुतळा उभारताना, स्मारक बनवताना विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. पण आता याचं राजकारण करुन काय उपयोग?
महाराजांचा एक पुतळा भंग झाला तर दोषींवर कारवाई करता येईल आणि दुसरा पुतळा उभारताही येईल. या दोन गोष्टी झाल्याच पाहिजे. मात्र शिवाजी महाराजांना आपण आराध्य का मानतो? आपण त्यांचे पुतळे का उभारतो? हे आपण समजून घेतलं पाहिजे. पुतळे उभारणं, स्मारक बांधणं यामागचा मुख्य हेतू त्या महापुरुषाचा खरा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे व त्यातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने राष्ट्र कार्य करणे असा आहे. यासाठी महापुरुषांची उपासना करायची असते, त्यांचे पोवाडे गायचे असतात. त्यांच्या नावावरुन जातीयवाद करणे, लोकांमध्ये फुट पाडणे, दंगली घडवणे, राजकारण करणे हा खरंतर त्या महापुरुषांचा अपमान असतो.
(हेही वाचा – Air Marshal Tejinder Singh यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला)
छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की महाराजांनी हिंदूंच्या मनातला वैचारिक गोंधळ संपुष्टात आणला. अनेक हिंदू सरदार मुघलांची व इतर म्लेंच्छांची गुलामी करत होते. भारतीय जनतेच्या मनामध्ये मळभ पसरलेलं होतं. सगळीकडे हाहाकार माजला होता. आपण मनाने गुलामगिरी स्वीकारली होती. कोणत्याही प्रकारचं अनुकूल वातावरण नव्हतं. अशा परिस्थितीत महाराजांनी लोकांना प्रोत्साहित केलं की हा देश आपला आहे, कुणाचे तरी गुलाम होण्यासाठी हिंदूंचा जन्म झालेला नाही, या देशावर आपलं राज्य असलं पाहिजे, हिंदवी स्वराज्य असलं पाहिजे. एकीकडे त्यांनी लोकांच्या मनातलं मळभ दूर केलं आणि दुसरीकडे जिहादी सत्तेविरुद्ध संघर्ष सुरु ठेवला. याचा लाभ असा झाला की मराठी माणसांनी सबंध भारत जिहाद्यांच्या तावडीतून मुक्त केला.
पुढे दुर्दैवाने आपल्यात एकी राहिली नसल्यामुळे इंग्रजांनी मराठी माणसाकडून म्हणजेच हिंदूंकडून भारत हिसकावून घेतला. मात्र आपल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार असल्यामुळे आपण हिंदवी स्वराज्याचा अट्टाहास सोडला नाही. इंग्रजांना नामोहरम करून सोडलं. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरामध्ये प्रचंड मार खाल्ल्यामुळे इंग्रजांनी हिंदूंशी थेट युद्ध करण्याऐवजी वैचारिक युद्ध आरंभ केलं. भारतात खोटी लोकशाही स्थापित केली. कॉंग्रेसची स्थापना झाली आणि कॉंग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांना बाजूला सारलं. टिळकांनी मात्र स्वराज्य हा शब्द उच्चारला आणि शिवाजी महाराजांचा आदर्श घेवून राजकारण केलं. टिळकांनी मराठा नावाचं नियतकालिक इंग्रजांच्या मनात मराठ्यांचा धाक कायम ठेवण्यासाठी काढलं. मात्र टिळकयुग संपल्यानंतर छद्य-अहिंसा युग सुरु झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कॉंग्रेसने पूर्णपणे नाकारलं. परिणामस्वरूप फाळणी आणि हिंदुंवर अनन्वित अत्याचार झाले. तर एक पुतळा भंग झाल्याने जे विरोधक राजकारण करत अहेत, त्या विरोधकांनी महाराजांचं स्वप्न भंग केलेलं आहे. महाराजांना जे नको होतं तेच केलेलं आहे. जातीमध्ये फुट निर्माण करणे, महाराष्ट्राचा मणीपूर करण्याचं कारस्थान रचणे, हिंदूंना विभागणे, देशात असंतोष माजवणे हे छत्रपती शिवाजी महाराजांना नकोय आणि विरोधक हेच करत आहेत. म्हणूनच भंग झालेला पुतळा पुन्हा उभारता येईल, पण छत्रपतींचे विचार जनमानसात रुजवले पाहिजेत, त्यांचं स्वप्न साकार झालं पाहिजे. हे प्रत्येक हिंदूने लक्षात ठेवलं पाहिजे व विरोधकांचा डाव मोडून काढला पाहिजे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community