श्रावण महिन्यात येणारा नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन हा सण कोळी-बांधवांसाठी आणि भावा- बहिणींसाठी फारच आनंदाचा असतो.
रक्षाबंधन/ रक्षासूत्र, शुभमुहूर्त
श्रावण महिन्यात बांधले जाणारे रक्षासूत्र हे भाऊ-बहिण यांच्यातील निस्सीम प्रेमाचे प्रतीक आहे. यादिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला भेटवस्तू देतो. यावर्षी २२ ऑगस्ट रविवारी सकाळी ०६ :१५ ते संध्याकाळी ५ :३१ पर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.
(हेही वाचा : राज ठाकरेंवर राष्ट्रवादीने का केला ‘ट्विटर’ हल्ला?)
काय असतो राखीपौर्णिमेचा संदेश!
राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो आणि मन प्रफुल्लीत होते. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.
रक्षाबंधनाचे आधुनिक स्वरुप
हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा (भावंड) आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात. सध्या कोरोनामुळे भावाला बहिणीकडे जाण्यासाठी मर्यादा आल्याने डिजिटल स्वरुपात रक्षाबंधन साजरा करण्याकडे कल आहे. आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रासहित राखी तसेच व्हिडिओ कॅालच्या माध्यमातून साजरे होणारे रक्षाबंधन या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम. आपल्या देशात प्रेम, आपुलकी अजुनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम आहे.
Join Our WhatsApp Community