श्रावण महिना हा सणासुदीचा महिना. रक्षाबंधन हा हिंदूंचा एक महत्वाचा सण. आपल्याला सेक्युलर नावाचा रोग झाला असल्यामुळे बऱ्याचदा मुलांसमोर बोलताना अनेक वक्ते राणी कर्णावती आणि हुमायूँची गोष्ट सांगतात. कर्णावतीने बादशाह हुमायूँला राखी पाठवली. पण बादशाहने तिला वाचवलं की नाही? हा प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होत नाही. यालाच सेक्युलर रोग म्हणतात. इतिहासकारांनी या कथेला पुष्टी दिलेली नाही. जे लोक देशाला लुटायला आले होते, ते आपलं रक्षण राखीसाठी का करतील? राजकीय खेळी वेगळी आणि राखीसारखा पवित्र सण वेगळा.
( हेही वाचा : एल ब्रूस शिखर पादाक्रांत करण्यासाठी वीर सावरकर स्मारकाचे प्रणीत शेळके यांना कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या शुभेच्छा )
या सणाची राष्ट्रीय व्याप्ती
मुघलांनी आपला देश लुटला, देवळे तोडली, गाव बेचिराख केली, आपल्या बहिणींवर अनन्वित अत्याचार केले. अशावेळी जे योद्धे या रानटी प्रवृत्तीच्या विरोधात लढले, त्यांनी खऱ्या अर्थाने रक्षाबंधन हा सण साजरा केला आहे, असे म्हणावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक महापुरुषांनी आपल्या बहिणींचे रक्षण केलेले आहे. रक्षाबंधन हा सण वैयक्तिक स्तरावर साजरा करताना, या सणाची राष्ट्रीय व्याप्ती आपण समजून घेतली पाहिजे.
आपण सैनिकांना राखी का पाठवतो? कारण ते आपल्या सीमांचे रक्षण करतात, पोलिस देखील आपले रक्षण करतात. म्हणूनच त्यांना आपण राखी बांधतो. शिवरायांपासून सावरकरांपर्यंत महात्म्यांनी आपल्या देशाचे रक्षण केले आहे, रानटी विस्तारवाद्यांच्या जुलमी हातातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. आपण सावरकर चरित्राचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या प्रत्येक धार्मिक किंवा उत्सवाच्या गोष्टीचा संदर्भ त्यांनी राष्ट्रीय हिताशी जोडलेला आहे.
राष्ट्रीय एकात्मता उद्देश
सत्यनारायणाच्या पोथीत राष्ट्रीय कल्याणाचा आणखी एक अध्याय त्यांनी जोडायला सांगितला. साने गुरुजींनी जानव्याचा त्याग केला, तर सावरकरांनी सर्व हिंदूंना हा अधिकार मिळवून दिला. एखादी गोष्ट बंद पाडणे, याऐवजी ती गोष्ट जनतेच्या हिताची करणे यावर सावरकरांनी भर दिला आहे. लोकमान्य टिळकांनी देखील सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. राष्ट्रीय एकात्मता हा त्यांचा उद्देश होता.
रक्षाबंधन या सणाला राष्ट्रीय दृष्टीकोनातून महत्व प्राप्त झाले पाहिजे. लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन तलाकचा कायदा करुन मुस्लिम बहिणींना न्याय मिळवून दिला आहे. ३७०, ३५ए रद्द करुन काश्मिरी बहिणींना न्याय मिळवून दिला आहे. भारतातील बहिणींचे ते खरे भाऊराया आहेत. या रक्षाबंधनाला अशाच एका नायकाला राखी पाठवू शकता. एखाद्या महापुरुषाला राखी अर्पण करु शकता. यासाठी प्रत्येक सोसायटी पुढाकार घेऊ शकते. अमूक अमूक सोसायटीतून काही तरुण मुलं-मुली हा उपक्रम राबवू शकतात. हर घर तिरंगा या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे एकात्मतेची भावना निर्माण होत आहे. ही भावना आपल्याला अधिक दृढ करायची आहे. एक राष्ट्र म्हणून आपण सगळे बंधू-भगिनी आहोत.
Join Our WhatsApp Community