भागोजीशेट कीर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी पदयात्रा काढण्यात आली. वरळीतील बेंगॉल केमिकल ते दादर येथील भागोजीशेट स्मशानभूमीपर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, पदयात्रा प्रमुख किशोर केळसरकर, समन्वयक जगदीश आडविरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सध्याच्या स्थितीबाबत खंत
यावेळी हिंदुस्थान पोस्टसोबत बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर यांनी सध्याच्या स्मशानभूमीच्या स्थितीबाबत खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘महामानव भागोजीशेट यांच्या स्मृतिसमितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या पदयात्रेचे हे १७ वे वर्ष आहे. भागोजी यांनी हिंदुंसाठी हिंदू स्मशानभूमी बांधून दिली. १९२० साली नऊ एकर भूखंड विकत घेऊन ही हिंदू स्मशानभूमी बांधून ती दान केली होती. त्यावेळेस सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती वेगळी होती. मुंबई ही सात बेटांची होती. सामाजिक परिस्थितीत उच्च-निच्च असे भेदभाव जास्त होते. उच्चवर्णींयांसाठी चंदनवाडी स्मशानभूमी होती. तिथे उच्चभ्रू लोकं जायचे. यामुळे हिंदूंचा एक वर्ग भागोजीशेट यांच्याकडे गेला आणि स्मशानभूमी बांधण्यासाठी विनंती केली. त्यावेळेला ब्रिटीशांच्या काळात या महामानवाने ही जागा विकत घेऊन हिंदूंसाठी स्मशानभूमी उभारली.
‘सावरकरांनी शब्द टाकायचा आणि भागोजींनी तो झेलायचा’
या कार्यक्रमात बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी सावरकर आणि भागोजीशेट यांच्यातील नातं सांगितलं. मंजिरी मराठे म्हणाल्या की, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भागोजीशेट यांचे अतिशय जीवाभावाचे संबंध होते. रत्नागिरीत सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे आणि जाती भेद उच्चाटनाचे जे काम केलं, त्याला आर्थिक बळ देण्याचं काम भागोजीशेट यांनी केलं. सावरकरांनी शब्द टाकायचा आणि भागोजींनी तो झेलायचा, असं त्या दोघांचं अतिशय जवळचं नातं होत. दोघांनी आपल्या जातीसाठी नाही, तर जाती भेदाचं उच्चाटन करण्याचं काम केलं. आज आपण सर्वांनी जाती-पाती बाजूला सारून एक हिंदू म्हणून एकत्र येण्याची अतिशय गरज आहे. जरी सावरकर ब्राम्हण असेल तरी त्यांनी अस्पृश्यांना जवळ केलं, त्यांना हरिजन म्हणू नका असं त्याचं सांगणं होतं. ज्या समाजाला देवळाच्या पायरीपर्यंत जाता येतं नव्हतं, त्यांना गाभाऱ्यात जाऊन पुजा करण्याचा मान सावरकर आणि भागोजीशेट यांनी दिला. त्यामुळे आज आपण सर्वांनी या विचारांनी पुढे जाण्याची गरज आहे. आज राजकारणासाठी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण केले जाताहेत, त्यामुळे आपण सर्वांनी हे विसरून पुढे गेलं पाहिजे.
(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांवर श्रद्धा ठेवणारे भागोजीशेट कीर)
मंजिरी मराठे म्हणाल्या की, सावरकर असं म्हणाले होते की, प्रत्येक जातीचं वैशिष्ट असतं, तेवढ्यापुरतीच ती जात मानली जावी. पण इतर वेळेला प्रत्येक समाजानं एक हिंदू म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. १९४७ मध्ये जी स्थिती भारताची होती, ती स्थिती आता २०४७ मध्ये येऊ शकते. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या भारताचं विभाजन होऊ द्यायचं नसेल, तर सर्व समाजानं एकसंघ होण्याची गरज आहे, एक हिंदू म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. भागोजीशेट कीर यांचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे त्यांनी व्यवसाय शिक्षण देण्याचं खूप महत्त्वाचं काम केलं. आजही व्यवसाय मार्गदर्शन केलं जाणं अतिशय गरजेचं आहे.
Join Our WhatsApp Community