Ram Janmabhoomi Movement : रामजन्मभूमी आंदोलनाचे राजकीय परिणाम

अयोध्येतील रामजन्मभूमीवरील मंदिर हा विषय राजीव गांधींना इतका महत्वाचा वाटत होता की, १९८९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी त्यांनी ‘देशात रामराज्य आणणे’ हा मुद्दा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला.

205
Ram Janmabhoomi Movement : रामजन्मभूमी आंदोलनाचे राजकीय परिणाम
Ram Janmabhoomi Movement : रामजन्मभूमी आंदोलनाचे राजकीय परिणाम
  • माधव भांडारी 

१९९० नंतरचा काळ हा रामजन्मभूमी आंदोलनाचा काळ होता. १९८३ सालापासून सुरु झालेले रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन अवघ्या पाच सहा वर्षांत देशव्यापी बनले होते, समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आणि देशाच्या काना कोपऱ्यात पोचले होते. सुरुवातीची काही वर्षे ह्या आंदोलनाकडे फार कोणी लक्ष दिले नव्हते. पण त्याच काळामध्ये हे आंदोलन जनमानसापर्यंत पोचवण्यात आंदोलनकर्त्यांनी यश मिळवले होते. १९८५-८६ सालापासून रामजन्मभूमी हा विषय भारतीय जनतेच्या विचारपद्धतीवर प्रभाव टाकू लागला होता. त्यामुळे भारतीय राजकारणाचा पोत पूर्णपणे बदलत गेला. १९८९ साली झालेली कारसेवा ही त्या आंदोलनामुळे निर्माण होऊ लागलेल्या वातावरणाची पहिली झलक होती. (Ram Janmabhoomi Movement)

विषय महत्वाचा वाटलेला; पण…  
शाह बानो व अन्य अनेक कारणांनी काँग्रेसवर नाराज झालेल्या हिंदू समाजाला गोंजारण्यासाठी अयोध्येतील रामजन्म भूमी वरील रामलल्ला मंदिराचे कुलूप काढण्याचा सल्ला काही निकटवर्तीयांनी राजीव गांधींना दिला होता. त्यानुसार पुढचा सारा घटनाक्रम घडत गेला. ९ नोव्हेंबर १९८९ रोजी अयोध्येत त्याच जागेवर संकल्पित राम मंदिराचा शिलान्यास करण्याची परवानगीही ह्याच पद्धतीने राजीव गांधी सरकारकडून दिली गेली. अयोध्येतील रामजन्मभूमीवरील मंदिर हा विषय राजीव गांधींना इतका महत्वाचा वाटत होता की, १९८९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी त्यांनी ‘देशात रामराज्य आणणे’ हा मुद्दा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला. एवढेच नाही तर त्या निवडणूक प्रचार मोहिमेचा शुभारंभ त्यांनी अयोध्येतून केला. ह्या सर्व गोष्टींचा त्यांना किंवा काँग्रेसला काहीच फायदा झाला नाही, हा भाग वेगळा! १९८४ साली झालेल्या निवडणुकीत राजीव गांधी व काँग्रेसला ४१४ जागा मिळाल्या होत्या. अर्थात त्या यशामागे श्रीमती इंदिरा गांधींच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा प्रभाव होता. पण तो प्रभाव ओसरल्यानंतर तीच काँग्रेस त्याच राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली १९८९ साली केवळ १९७ जागा जिंकू शकली. (Ram Janmabhoomi Movement)

(हेही वाचा – SBI Report: राम मंदिरामुळे अयोध्येतील पर्यटनाला चालना, उत्तर प्रदेश सरकारला होणार किती कमाई; वाचा सविस्तर)

हिंदू व मुस्लीम दोन्ही समाज काँग्रेसवर नाराज झाले
ह्याच निवडणुकीपूर्वी, ११ जून १९८९ रोजी भारतीय जनता पार्टीने रामजन्मभूमी आंदोलनाला सक्रीय पाठींबा व सहभाग जाहीर केला होता. भाजपाने आपल्या जाहीरनाम्यातच अयोध्येतील रामजन्मभूमीवरील मंदिराच्या उभारणीचा मुद्दा समाविष्ट केला होता. ज्या भाजपाला १९८४ च्या निवडणुकीत केवळ दोन जागा मिळाल्या होत्या, त्याच भाजपाने १९८९ साली ८६ जागा जिंकल्या. मतदारांचा कौल अशाप्रकारे बदलण्यामागे जी अनेक कारणे होती त्यात शाह बानो प्रकरण हे एक प्रमुख कारण होते. रामजन्मभूमी हा विषय समाजाच्या सर्व थरात पोचला होता व त्यावर काही एक लोकमत तयार होत होते, हेही महत्वाचे कारण होते. जनमानसातील हा बदल राजीव गांधी व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी वेळीच ओळखला होता. पण त्याबद्दल काय भूमिका घ्यावी ह्या विषयावर त्यांच्यात संभ्रम होता. हिंदू व मुस्लीम ह्या दोन्ही समाजांना एकाच वेळी चुचकारण्याचा प्रयत्न ते करीत होते. योग्य भूमिका घेतली असती तर कदाचित त्यांना यश देखील मिळाले असते. पण सुन्नी मुस्लीम समाजातील मूठभर कट्टरपंथीय लोक आणि डाव्या मंडळींच्या अपप्रचार तंत्राला व दबावाला बळी पडल्यामुळे त्यांना योग्य भूमिका ठरवता आली नाही. त्यांनी रामजन्मभूमीचा विषय सन्मानाने सोडवण्याचा विचार न करता केवळ त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हिंदू व मुस्लीम हे दोन्ही समाज काँग्रेसवर नाराज झाले. त्याचा फटका त्यांना १९८९ साली झालेल्या निवडणुकीत बसला. (Ram Janmabhoomi Movement)
राजकारणाला वळण देणारा मुद्दा
रामजन्मभूमी हा विषय १९४९ सालानंतर तब्बल चाळीस वर्षांनी पुन्हा एकदा राजकारणाला वळण देणारा मुद्दा बनू लागला होता, राजकारणाच्या केंद्रस्थानी आला होता हे त्या निवडणुकीने स्पष्ट केले. १९९१ च्या निवडणुकांच्या वेळी, प्रचाराच्या रणधुमाळीत राजीव गांधींची हत्या केली गेली. त्यातून निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसला काहीसे जीवनदान मिळाले आणि नरसिंह राव ह्यांच्या नेतृत्वाखाली अल्पमतातील सरकार स्थापन करण्यात त्यांना यश मिळाले. पण ते तात्कालिक होते. त्यानंतरच्या काळात हे परिवर्तन अधिक दृढ होत गेले.  नेहरूप्रणित secularism व समाजवाद ह्या मुद्द्यांकडे पाठ फिरवून राष्ट्रवाद आणि भारतीय विचारांवर, म. गांधी व पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांवर आधारित अर्थव्यवस्था हे मुद्दे जनतेने स्वीकारले. हे वैचारिक परिवर्तन भारतीय राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलणारे होते. ह्या वैचारिक परिवर्तनाला चालना व वेग देण्याचे काम रामजन्म भूमी ह्या विषयाने व त्यावरील आंदोलनाने केले. (Ram Janmabhoomi Movement)

(हेही वाचा – Chandrapur: चंद्रपुरात ‘सियावर रामचंद्र की जय’ या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी !)

काँग्रेसला  धडा मिळणार 
रामजन्मभूमी विषयक आंदोलनातून तयार झालेले जनमानस प्रभावी रीतीने प्रकट व्हायला २०१४ साल उजाडले. त्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. २०१९ साली पूर्वीपेक्षा अधिक जागा व मते मिळवून भाजपाने सत्ता राखली तर काँग्रेस आणि डाव्यांना आपली घसरण रोखता आली नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये देशाच्या राजकीय परिस्थितीत मोठे परिवर्तन झाले आहे. ‘देशाच्या राजकारणाचा एक अचल केंद्रबिंदू’ हे स्थान आता भाजपाने मिळवले आहे तर काँग्रेस पूर्णपणे संदर्भहीन होण्याची लक्षणे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील रामजन्मभूमीवरील मंदिराचे लोकार्पण होत आहे. संपूर्ण देशात उत्साहाची एक भव्य लाट निर्माण होते आहे. अशा वेळी, सर्व १३० कोटी जनता ज्या दिशेने जाऊ पाहत आहे तिकडे न जाता त्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय सोनिया – राहुल गांधींची काँग्रेस आणि त्यांच्या डाव्या साथीदारांनी घेतला आहे. त्यांच्या बहिष्कारामुळे सोहळ्याला कोणताच उणेपणा येणार नाही. पण, त्यांच्या ह्या जनताविरोधी भूमिकेची योग्य ती नोंद जनता घेतल्याशिवाय रहाणार नाही, हे निश्चित आहे. (Ram Janmabhoomi Movement)

(लेखक महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.