अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिरात (Ram Mandir) होणाऱ्या प्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. तयारीदरम्यानच अयोध्येत विमानतळही सुरू झालं आहे. त्यामुळे प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी इच्छुक असलेले भाविक, भक्त आणि प्रवाशांना विमानाने अयोध्येत जाणे शक्य होणार आहे, मात्र सोहळ्यापूर्वीच विमानाचे भाड्यावर त्याचा परिणाम झाला आहे.
अयोध्येला जाणाऱ्या विमानांचे भाडे अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानांपेक्षा जास्त झाले आहे. प्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वीच अयोध्येत पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे हॉटेल, ट्रेन आणि आता विमान भाड्यातही मोठी वाढ झाली आहे. १९ जानेवारीचे मुंबई ते अयोध्या तिकिट तपासल्यावर इंडिगो फ्लाइटचे भाडे २०,७०० रुपये दाखवले आहे, तर २० जानेवारीच्या विमान प्रवासाचे भाडेही २०,००० रुपये असल्याचे दिसते. जवळपास सर्वच विमान कंपन्यांची हीच अवस्था आहे. सध्या एअर इंडिया एक्सप्रेस आणि इंडिगो या दोनच विमान कंपन्यांनी अयोध्येसाठी उड्डाणे चालवण्याची घोषणा केली आहे, अशी माहिती फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झाली आहे.
अयोध्येला जाणारे विमान भाडे अनेक आंतरराष्ट्रीय मार्गावरील भाड्यापेक्षा जास्त आहे. १९ जानेवारीच्याच मुंबई ते सिंगापूरच्या फ्लाइटची तपासणी केली असता, एअर इंडियाच्या थेट फ्लाइटचे भाडे १०,९८७ रुपये दाखवण्यात आले आहे, तसेच १९ जानेवारीला मुंबई ते बँकॉक थेट विमानाचे भाडे १३,८०० रुपये आहे.
पर्यटन बाजारपेठेवर परिणाम
राम मंदिराच्या उद्घटनापूर्वीच अनेक प्रकारची व्यावसायिक उलाढाल अयोध्येत होत आहे. त्यामुळे आगामी काळात मागणी आणि पर्यटन बाजारपेठ यामुळे अनेक कंपन्या तयारी करत आहेत. अयोध्येत येऊन राहण्याकरिता पर्यटक मोठ्या प्रमाणात हॉटेल्स शोधत आहेत, अशी माहिती हॉस्पिटॅलिटी फर्मचे ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी दिली