अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) प्रभु श्रीरामाची मूर्ती आसनावर विराजमान झाली आहे तसेच राम लल्लाचे पहिले छायाचित्रही प्रसिद्ध झाले आहे. अत्यंत सुंदर आणि नयन मनोहर अशी ही मूर्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (२२ जानेवारी) या मूर्तीवर पुष्पचक्र अर्पण करणार आहेत.
मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाल्यावर प्राणप्रतिष्ठा होते. जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही, तोपर्यंत मूर्तीचा चेहरा सुती कापडाने झाकला जातो. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर मूर्तीवरील कापड काढले जाणार आहे. यामागे धार्मिक आणि प्राचीन परंपरा असून शास्रात याचे कारणही सांगितले आहे.
(हेही वाचा – Jaspal Rana : रायफल असोसिएशनच्या हाय परफॉर्मंन्स संचालकांनी जसपाल राणाला रेंज सोडून जायला का सांगितलं?)
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर देवतेला आरसा दाखवण्याचे कारण
असे म्हटले जाते की, ह्रदय डोळ्यांद्वारे संवाद साधते. डोळ्यांद्वारे भावना व्यक्त होतात. भक्त देवतेचे दर्शन घेताना मूर्तीच्या डोळ्यात पाहतो. यामुळे प्राणप्रतिष्ठेनंतरच देवाच्या डोळ्यात पाहू दिले जाते. प्रतिष्ठापनेवेळी ऊर्जा अर्थात प्रकाशाची किरणे देवतेच्या प्रतिमेत प्रवेश करतात. ही ऊर्जा डोळ्यांद्वारे बाहेर पडते. प्राणप्रतिष्ठेनंतर जेव्हा भगवंताचे डोळे उघडतात, तेव्हा अनंत शक्तीचे तेज मूर्तीच्या डोळ्यांतून बाहेर पडते. याकरिता यावेळी प्रभुला (देवतेला) आरसा दाखवला जातो.
रामलल्लाचे संपूर्ण छायाचित्र आले समोर !
अयोध्येत १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा विधीचा शुक्रवार, १९ जानेवारी हा चौथा दिवस आहे. तात्पुरत्या मंदिरातील रामलल्लाचे दर्शन शुक्रवार, सायंकाळपासून बंद करण्यात येणार आहे. २२ जानेवारीला अभिषेक झाल्यानंतर २३ जानेवारीपासून भाविकांना नवीन मंदिरात दर्शन घेता येणार आहे. तत्पूर्वी, गुरुवारी रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात आसनावर ठेवण्यात आली होती. कारागिरांनी मूर्ती एका आसनावर उभी केली. या प्रक्रियेला ४ तास लागले. ही मूर्ती सुगंधित पाण्यात ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये धान्य, फळे आणि तूपदेखील ठेवले जाईल. शुक्रवारी श्रीरामलल्ला यांना वैदिक मंत्रांसह औषधीवास, केशराधिवास आणि घृताधिवास देण्यात आला. त्यानंतर आरणी मंथनाद्वारे कुंडात अग्नि प्रकट करण्यात आला. श्रीरामलल्ला २० जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर सिंहासनावर विराजमान होतील. याबाबत जगद्गुरू रामभद्राचार्य म्हणाले की, गर्भगृहातील नवीन मूर्तीचा अभिषेक करण्यास कोणतीही अडचण नाही. लोकांच्या दर्शनासाठी हे करण्यात आले आहे. तात्पुरत्या राम मंदिरातील दर्शन शुक्रवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. या मूर्तीच्या डोळ्यांवरील पट्टीही काढण्यात आली आहे.