- नमिता वारणकर
आनंदोत्सव साजरा करण्याकरिता पूर्वीच्या काळी हत्तीवरून साखर वाटली जायची. जिजाऊंच्या जन्मावेळी त्यांचे वडील लखुजीराव जाधव यांनी हत्तीवरून साखर वाटली होती, असा संदर्भ इतिहासातील ग्रंथात सापडतो. अनेक वर्षांनंतर राम मंदिराच्या उभारणीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी दापोलीतील एक तरुण ही अनोखी संकल्पना राबवणार आहे. यामागील कारणही तितकेच ‘मर्मबंधी’ आहे.
अक्षय फाटक! असे या तरुणाचे नाव आहे. ते बांधकाम व्यावसायिक असून भाजप युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिरातील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी दापोलीत भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. या दिवशी हत्तीवरून साखर वाटण्यामागे काय भावना आहे, असे त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘राम मंदिरा’ची उभारणी होणे ही फक्त भारतातल्याच नाही, तर देश-विदेशातील कुठल्याही धर्मातल्या रामभक्तासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. दापोलीमध्ये आम्ही ५ पिढ्यांपासून राहतो. १९९४ सालापासून माझे वडील श्रीधर वासुदेव फाटक विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्य होते. त्यावेळी परिषदेचे अनेक कार्यक्रम व्हायचे. तेव्हा एका स्थानिक कार्यक्रमात कार्यकर्त्यांसमोर माझे वडील बोलले होते की, ‘ज्यावेळी राम मंदिर पूर्ण होईल त्यावेळी आपण हत्तीवरून साखर वाटू.’ त्यानंतर प्रत्यक्षात राम मंदिराची उभारणी झाली. राम मंदिर प्रतिष्ठापनेचा दिनांक ठरल्यानंतर बाबांचे कारसेवक मित्र आणि माझ्या ओळखीतल्या काही लोकांनी मला वडिलांच्या ‘या’ वाक्याची आठवण करून दिली, मात्र बाबा २०१० मध्ये देवाघरी गेले. त्यामुळे माझ्या काकांना विचारून ते नक्की असे म्हणाले होते का, याबाबत खात्री करून घेतली. त्यामुळे २२ जानेवारीला दापोलीत होणाऱ्या ‘भव्य गजराज शोभायात्रे’चे हे खास आयोजन केले आहे.
आजही लग्न, मुंज, समारंभ, सोहळे यासाठी काही श्रीमंत लोक हत्ती भाड्याने घेऊन साखर वाटण्याचा कार्यक्रम करतात. काळानुरुप गोष्टी बदलल्या. आनंद साजरा करण्याची ही संकल्पना आपण फक्त गोष्टीतच ऐकलेली असते. राम मंदिर पूर्ण होण्यासाठी जवळजवळ ५०० वर्षांचा संघर्ष करावा लागला आहे. एवढ्या वर्षांच्या कालावधीनंतर अनेक कार्यकर्त्यांची, भाविक, भक्तांची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा अवर्णनीय आनंदही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केल्यामुळे वडिलांच्या इच्छेचे पालन होईल, असे अक्षय म्हणाले.
(हेही वाचा – Sanjay Raut : पंतप्रधान काळाराम मंदिरात गेले; पण भगूरमधील सावरकर स्मारकाची त्यांना आठवण झाली नाही; संजय राऊत यांची टीका)
गजराज शोभायात्रा…
राम मंदिरातील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचा दिनांक ठरल्यानंतर दापोलीतल्या लक्ष्मीनारायण देवस्थान, भैरी देवस्थान, मारुती मंदिर आणि राम मंदिराच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. भव्यदिव्य शोभायात्रा काढायचे ठरवले. या शोभायात्रेत हत्तीवरून साखर वाटली जाणार आहे. शोभायात्रेचा हा प्रमुख आकर्षणाचा भाग आहे. याकरिता कर्नाटकमध्ये हत्तीचे बुकिंग केले आहे. हत्तीसोबत माहुतासह त्याला सांभाळण्याकरिता दोन-तीन व्यक्ती आहेत. दापोलीत २१ जानेवारीला रात्री हत्ती येईल आणि २२ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत शोभायात्रेत सहभागी होईल. गजराज शोभायात्रेकरिता वनखाते आणि पोलिसांची परवानगी घेतली आहे. साखर कागदी पाकिटात पॅक करून वाटली जाणार आहे. त्याकरिता २०० ग्रॅमची ७००० साखरेची पाकिटे तयार करण्यात आली आहेत. याशिवाय सोलापूरहून आणलेले हलगी वाद्य, कोकणातील प्रसिद्ध खानुबाजा वाद्य वाजवले जाणार आहे.
वडिलांची इच्छा पूर्ण होत असल्याचा आनंद आणि अभिमान!
काळानुरुप सर्व गोष्टी बदलत गेल्या. राम मंदिराची निर्मिती आधीच झाली असती, तर तेव्हा या आनंदाचे स्वरुप भव्यदिव्य असते. त्यामुळे तशाच स्वरुपात आजही आनंद साजरा व्हायला हवा. वडिलांच्या मनातील ही भावना या कृतीमुळे जपता येत आहे. ‘हिंदुत्व’ हे एकच ध्येय त्यांनी आयुष्यभर जपले. त्यांचे काम, व्यवहार, वागणूक या सर्वांमध्ये हिंदुत्वाची भावना होती. सतत काहीतरी वेगळे करण्याची उर्मीही त्यांच्यामध्ये होती. त्यामुळे मुलगा म्हणून श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंद ‘हत्तीवरून साखर वाटण्या’ची वडिलांची इच्छा पूर्ण करून करता येत आहे, ही खूपच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. यापुढेही वडिलांच्या ज्या इच्छा कळतील त्याही पूर्ण करणार असल्याचा विचार अक्षय फाटक व्यक्त करतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community