पाटणा जंक्शन येथील महावीर मंदिराने बिहारच्या वैशाली जिल्ह्यात रामायण विद्यापीठ उघडण्यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी इस्लामपूरमध्ये 12 एकर जमीनही निश्चित करण्यात आली आहे. रामायण विद्यापीठ सुरू करण्यासाठी महावीर मंदिर ट्रस्टने शिक्षण विभागाकडे धाव घेतली आहे.
शिक्षण विभागाकडे ड्राफ्ट सुपूर्द
महावीर मंदिर व्यवस्थापनाकडून अशी माहिती देण्यात आली आहे की जगातील अशा प्रकारचे हे एकमेव विद्यापीठ असेल, जिथे गोस्वामी तुलसीदासांचे रामचरितमानस, वाल्मिकी रामायण केंद्रस्थानी ठेवून भारतीय भाषा आणि सर्व प्रकारच्या रामायणांवर व्यापक अभ्यास आणि संशोधन केले जाईल. या प्रस्तावासह 10 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्टही महावीर मंदिराच्या वतीने शिक्षण विभागाला सादर करण्यात आला.
महावीर मंदिरातर्फे व्यवस्था
महावीर मंदिर ट्रस्टचे सचिव आचार्य किशोर कुणाल यांनी सांगितले की, वैशाली जिल्ह्यातील इस्माईलपूर येथील महावीर मंदिराची सुमारे 12 एकर जमीन रामायण विद्यापीठासाठी निश्चित करण्यात आली आहे. येथे विद्यापीठाची मुख्य इमारत, शैक्षणिक इमारत यासह सर्व मूलभूत सुविधा बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक रकमेची व्यवस्था महावीर मंदिरातर्फे करण्यात येणार आहे.
( हेही वाचा: एसटी संपाचा तिढा सुटणार? परिवहन मंत्र्यांशी होणार बैठक )
हे विषय शिकवले जाणार
आचार्य किशोर कुणाल यांनी सांगितले की, आर्थिक स्वावलंबन लक्षात घेऊन रामायण विद्यापीठात पाच प्रमुख विषय शिकवले जाणार आहेत. ज्योतिष, विधी, आयुर्वेद, योग आणि प्रवचन हे विषय शिकवले जाणार आहेत. या विषयांमध्ये विविध स्तरांचा अभ्यास करून विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील.
Join Our WhatsApp Community