Ramayan: आजही ‘रामायण’ देशामध्ये टिकून असल्याचे कारण काय? वाचा सविस्तर…

रामाच्या कथा प्रसाराचे दोन व्यापक कालखंड आहेत. पहिल्या कालखंडात प्रभु श्रीराम थायलंड, कंबोडिया, लाओस, चीन, तिबेट आदी देशांमध्ये पोहोचले, तर दुसरा कालखंड म्हणजे १९ वे शतक.

156
Ramayan: आजही 'रामायण' देशामध्ये टिकून असल्याचे कारण काय? वाचा सविस्तर...
Ramayan: आजही 'रामायण' देशामध्ये टिकून असल्याचे कारण काय? वाचा सविस्तर...

रामाची कथा आशियातील लाओस, कंबोडिया, थायलंडपासून दक्षिण अमेरिकेतील गयाना ते आफ्रिकेतील मॉरिशसपर्यंत लोकप्रिय आहे. रामायण हे महाकाव्य आजही देशांमध्ये टिकून असण्याचे कारण काय ? सविस्तर जाणून घेऊया…

रामाच्या कथा प्रसाराचे दोन व्यापक कालखंड आहेत. पहिल्या कालखंडात प्रभु श्रीराम थायलंड, कंबोडिया, लाओस, चीन, तिबेट आदी देशांमध्ये पोहोचले, तर दुसरा कालखंड म्हणजे १९ वे शतक. या शतकात त्यांची अद्वितीय ओळख आफ्रिका, कॅरिबियन आणि ओशनियाच्या काही भागांमध्ये लोकप्रिय झाली.

रामायण (ramayan) आशिया खंडात कसे पसरले?
न्यूयॉर्क येथील सेंट जॉन युनिव्हर्सिटीचे आशियाई इतिहास आणि धर्म या विषयाचे तत्कालीन सहायक प्राध्यापक संतोष एन. देसाई यांनी १९६९ मध्ये लिहिल्याप्रमाणे, रामायण ‘ख्रिश्चन युगाच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये’ भारतातून उर्वरित आशियापर्यंत तीन मार्गांनी पसरत होते. यात जमिनीद्वारे, उत्तरेकडील मार्गाने रामायणाच्या कथा पंजाब आणि काश्मीरमधून चीन, तिबेट आणि पूर्व तुर्कस्तानपर्यंत गेल्या. समुद्रमार्गे, दक्षिणेकडील मार्गाने गुजरात आणि दक्षिण भारतातून जावा, सुमात्रा आणि मलायामध्ये गेल्या आणि पुन्हा जमिनीद्वारे, पूर्वेकडील मार्गाने बंगालमधून बर्मा, थायलंड आणि लाओसमध्ये गेल्या. व्हिएतनाम आणि कंबोडियाला या कथा काही प्रमाणात जावामधून आणि अंशतः भारतातून पूर्वेकडील मार्गाने मिळाल्या.

भारतीय लोक ख्रिश्चन युगाच्या सुरुवातीच्या शतकात या प्रदेशात जायचे, याचे मुख्य कारण होते व्यापार. मसाले, सोने आणि सुगंधी लाकूड यांच्या व्यापारासाठी लोक जात असत. यांच्यातील बरेच लोक तिथेच राहू लागले. कारण काहींनी तेथील स्थानिक महिलांशी लग्न केले, तर काहींना तिथे रोजगार मिळाला.

इतिहासकार कर्मवीर सिंग यांनी, कल्चरल डायमेन्शन ऑफ इंडिया थायलंड रिलेशन : अ हिस्टोरीकल परस्पेक्टिव्ह (२०२२) नावाच्या एका शोधनिबंधात लिहिले आहे की, व्यापारी त्यांच्यासोबत भारतीय धर्म, संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञान घेऊन आले. त्यांच्यात ब्राह्मण पुजारी, बौद्ध भिक्खू, विद्वानदेखील होते. या सर्वांनी दक्षिणपूर्व आशियातील मूळ रहिवाशांपर्यंत भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

कालांतराने रामायण अनेक देशांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनले. थायलंडमध्ये अयुथया राज्य (१३५१ ते ७६७) हे रामायणातील अयोध्येवर आधारित असल्याचे मानले जाते.
कंबोडियामध्ये १२ व्या शतकात बांधलेल्या अंगकोर वाट मंदिराच्या संकुलात रामायणातील भित्तीचित्रे आहेत. मूळतः हे मंदिर विष्णूला समर्पित मंदिर आहे. जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आणि आठवे आश्चर्य म्हणूनदेखील या मंदिराला मान्यता लाभली आहे.

आजही ‘रामायण’ या देशांमध्ये टिकून असल्याचे कारण काय?
आग्नेय आशियाई देशांमध्ये प्रबळ धर्म बौद्ध धर्म (उदा. कंबोडिया, लाओस) आणि इस्लाम (मलेशिया, इंडोनेशिया) आहेत. तरीही रामायण आजही या देशांच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ‘रामकियन’ रामायणाचेच स्वरूप असल्याचे सांगण्यात आले असून हे थायलंडचे राष्ट्रीय महाकाव्य आहे. येथील विद्यमान राजा चक्री घराण्यातील आहे. ज्यांच्या सर्व राज्यकर्त्यांचे नाव रामाच्या नावावर आहेत. लाओसमध्येही, ‘फ्रा रामची’ कथा राष्ट्रीय महाकाव्य आहे.

या सर्व देशांमध्ये राम कथेत विविध बदल झाले आहेत. तसेच, रामाच्या कथेच्या त्यांच्या आवृत्त्यांची प्रेरणा वाल्मिकी रामायण असेलच असे नाही. उदाहरणार्थ, ज्या देशांमध्ये ही कथा दक्षिण भारतातील व्यापार्‍यांनी लोकप्रिय केली होती, तेथे ती तामिळ महाकाव्य कंबन रामायणाशी साम्य दर्शवते. दिवंगत विद्वान ए. के. रामानुजन यांनी लिहिले, “अठराव्या शतकातील थाई रामकियन यात तमिळ महाकाव्याचे साम्य दिसून येते. उदाहरणार्थ, थाई रामकियनमधील अनेक पात्रांची नावे संस्कृत नसून स्पष्टपणे तामिळ नावे आहेत.”

रामाच्या या कथांमध्ये भारतीय महाकाव्य रामायणात अनेक फरक आढळतात. जसे ‘कंबोडियाच्या रेमकरमध्ये’ एक जलपरी राजकुमारी सुवन्नमाचा भगवान हनुमानाच्या प्रेमात पडते. जावामध्ये, जावानीज देवता ध्यान आणि त्यांची मुले या कथेचा भाग बनतात. ‘मलेशियन हिकायत सेरी’मध्ये रामाला रावण (महाराजा वाणा) बद्दल अधिक सहानुभूती आहे. लाओसमध्ये “फ्रा राम हा गौतम बुद्धाचा पूर्वीचा अवतार मानला जातो, तर हापमानसौने म्हणजेच लाओ रावण हा बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी आलेल्या ‘मार’चा पूर्वीचा अवतार मानला जातो”, असे ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन सेंटर फॉर साऊथ ईस्ट आशिया अँड इट्स डायस्पोरा’मधील एका लेखात प्रसिद्ध झाले आहे. या सर्व देशांमध्ये नाटके, नृत्यकला, कठपुतलीचे खेळ इत्यादींद्वारे आजही कथा जिवंत ठेवली गेली आहे.

आशियाबाहेरील रामायण
रामायण आफ्रिका, कॅरिबियन इत्यादी देशांत घेऊन जाणारा मोठा प्रवाह म्हणजे १९ व्या शतकात भारताबाहेर झालेले गिरमिटिया लोकांचे स्थलांतर. युरोपियन वसाहतींमधील गुलामगिरी हळूहळू संपुष्टात आली. यावेळी मनुष्यबळाच्या गरजा भागवण्यासाठी आणि वृक्षारोपणावर काम करू शकतील अशा आशिया आणि आफ्रिकेतील मजुरांची मागणी होऊ लागली, तेव्हा मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरुष ब्रिटीश भारतातून ‘इंडेंटर्ड’ मजूर म्हणून फिजी, मॉरिशस, त्रिनिदाद यांसह टोबॅगो, गयाना, सुरीनाम इत्यादी देशांमध्ये पाठवण्यात आले. ‘गिरमिटिया’ हा शब्द ‘करार’ या शब्दावरून आला आहे. ज्या करारावर या सर्व लोकांनी स्वाक्षरी केली.

या गिरमिटियातील बहुतांश मजूर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील होते. संपूर्णपणे नवीन जीवनाकडे जाणारे हे सर्व मजूर जहाजात फार काही नेऊ शकले नसले तरी त्यांनी संस्कृती आणि आपला धर्म सोबत नेला. या संस्कृतीचा एक मोठा भाग म्हणजे तुलसीदासांचा रामचरितमानस. रामचरितमानस हा उत्तर भारतातील सर्वात लोकप्रिय धार्मिक ग्रंथ होता.

गिरमिटिया या देशांमध्ये कसे टिकले?
गिरमिटिया तेथील राजांवर प्रभाव पाडू शकतील असे त्यांच्याकडे काहीच नव्हते. ते श्रीमंत व्यापारीही नव्हते. मात्र, तरीही त्यांनी रामाची कथा स्वतः जवळ ठेवून या कथांचे जतनही केले. दरिद्री, जातीय अत्याचार, सामाजिक बहिष्कार या कारणांमुळे हे लोक परदेशात आले. त्यांच्याजवळ केवळ रामचरितमानस हेच त्यांच्या मातृभूमीचे प्रतीक म्हणून होते, ज्याचा सांभाळ त्यांनी केला.

  • त्रिनिदादमध्ये मजुराच्या कुटुंबात जन्मलेले लेखक व्ही. एस. नायपॉल यांनी लिहिले, “गांधी, नेहरू आणि इतरांनी कार्य केले ते ऐतिहासिक आणि वास्तविक होते. आम्ही ज्या भारतातून आलो होतो, तो भारत आमच्यासाठी आपले हिंदू महाकाव्य रामायणाच्या भूमीइतका काल्पनिक होता.”
  • गयाना येथे गिरमिटिया कुटुंबात जन्मलेले ब्रिटीश इतिहासकार क्लेम सीचरन यांनी लिहिले आहे की, त्यांच्या पूर्वजांसाठी, रामायण… मातृभूमीचे अस्सल प्रतीक म्हणून रचले गेले; कारण वास्तविक पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहार नकाशातूनच गायब झाले आहेत. ते हेदेखील स्पष्ट करतात की, रामायणातील भारत टिकून राहिला. दंडक जंगलात वनवासात असलेल्या भगवान रामाची कथा भारतीयांमध्ये रुजलेली आहे. त्यांच्या अयोध्येतील विजयी पुनरागमनात एक ताजेपणा दिसतो.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.