नाशिकहून परतलेल्या रमेश पवार यांच्याकडे पुन्हा सहआयुक्त(सुधार)चा भार: कुंभारांकडील दक्षता काढून शिक्षण कायम

राज्यातील ठाकरे सरकारने मुंबई महापालिकेच्या सहआयुक्तपदी असलेल्या रमेश पवार यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली होती. परंतु राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार येताच २२ जुलै रोजी त्यांची या पदावरून उचलबांगडी केली. तेव्हापासून पुनर्वसनाच्या शोधात असलेल्या  रमेश पवार यांची महापालिकेतील मूळ पदावर पदस्थपना करण्यात आली आहे. पवार यांच्याकडे पुन्हा एकदा सहआयुक्त सुधार) या पदाचा भार सोपवण्यात आला असून या पदी असलेल्या केशव उबाळे यांच्याकडे आता उपायुक्त (दक्षता)  विभागाची जबाबदारी सोपवली आहे. तर सनदी अधिकारी असलेल्या सह आयुक्त अजित कुंभार यांच्याकडे केवळ शिक्षण विभाग ठेवण्यात आले आहे.
नाशिक महापालिका आयुक्तपदी रमेश पवार यांच्या नियुक्तीचे आदेश २२ मार्च २०२२ रोजी नगरविकास विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात  आले आहेत. यामध्ये रमेश पवार यांची प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात  येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रमेश पवार यांनी सहआयुक्तपदावरून कार्यमुक्त होऊन नाशिक महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारावा व तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा असे म्हटले आहे. त्यामुळे पवार यांच्याकडील सहआयुक्त (सुधार) विभागाचा भार मालमत्ता विभागाच्या सहायक आयुक्त पदावरून उपायुक्त पदी बढती देण्यात आलेल्या केशव उबाळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. पण राज्यात सत्तापालट होताच २२ जुलै रोजी सनदी अधिकाऱ्यांच्या जागेवर बेकायदा केलेली नियुक्ती रद्द करून नाशिकच्या आयुक्त पदी चंद्रकांत पुलकुंडवार  यांची नियुक्ती करत रमेश पवार यांना पदमुक्त केले होते. तेव्हापासून रमेश पवार रजेवर होते. दरम्यान, शासनाकडून त्यांची कुठेही नियुक्ती न झाल्याने त्यांनी महापालिकेत परतण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार महापालिकेला आपली पदस्थापना करावी अशी विनंती केली.
( हेही वाचा: अमरावती मनपा आयुक्त शाईफेक प्रकरणाचा तपास आता CID कडे, गृहमंत्री फडणवीसांचे आदेश )

त्यानुसार वरिष्ठ सहआयुक्त असल्याने त्यांच्याकडे सुधार विभागाचा पदभार सोपवला जाईल अशी शक्यता होती. त्याप्रमाणे केशव उबाळे यांच्याकडील सुधार विभाग पुन्हा पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
त्यामुळे सनदी अधिकारी सहआयुक्त अजित कुंभार यांच्याकडे शिक्षण आणि दक्षता या दोन विभागाचा पदभार होता. त्यातील दक्षता विभाग हा उबाळे यांच्याकडे सोपवून कुंभार यांच्याकडे केवळ शिक्षण विभाग ठेवण्यात आले आहे. तर उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्याकडे मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाचे अतिरिक्त काम सोपवण्यात आले आहे. आधीच उपायुक्त पदे भरलेली असल्याने पुनर्वसनाअभावी चंदा जाधव यांची नियुक्ती होऊ शकली नाही. त्यामुळे अखेर एक महिन्याच्या सुट्टीवर त्या गेल्या. त्यानंतरच या उपयुक्तांची खांदे पालट करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here