शब्दांकन : सायली डिंगरे
अंगणाचे मांगल्य वाढवणारी रांगोळी ! रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. पूर्वी घराच्या अंगणाची शोभा वाढवणारी रांगोळी आता ग्लोबल होऊ लागली आहे. घराच्या अंगणातील ठिपक्यांच्या रांगोळीपासून चालू झालेला रांगोळीचा प्रवास आता मोठमोठ्या कार्यक्रमांचे आकर्षण असलेल्या व्यक्तीचित्र (र्पोट्रेट) रांगोळीपर्यंत पोहोचला आहे. दिवाळी हा ज्याप्रमाणे दिव्यांचा सण आहे, त्याप्रमाणे तो सुंदर आणि मनमोहक रांगोळ्यांचाही सण आहे. त्या निमित्ताने डोंबिवली येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार उमेश पांचाळ यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊया रांगोळीचे बदलते रूप, सध्याचे ट्रेंड्स आणि लोकांची रांगोळीविषयी बदलती मानसिकता याविषयी उमेश पांचाळ यांचे विचार !
सध्याचे ट्रेंड
सध्या संस्कार भारती आणि पोर्ट्रेट रांगोळ्यांचा ट्रेंड आहे. संस्कार भारती प्रकारच्या रांगोळ्यांना तर मागणी असतेच. त्यासोबत पोर्ट्रेट रांगोळ्याही काढून घेतल्या जातात. संस्कार भारतीमध्ये आकारांची सुंदरता असते, तर पोर्ट्रेट रांगोळ्यांमध्ये चेहऱ्यावरचे भाव, रंगांच्या छटा हे आव्हान असते. दोन्ही प्रकारच्या रांगोळ्या कार्यक्रमांच्या आकर्षणाचा बिंदू ठरतात, हे तितकेच खरे आहे.
रांगोळीमागचे अर्थकारण
आता रांगोळी हा सेलिब्रेशनचा भाग झाला आहे. सर्वांना त्यांच्या छोट्या मोठ्या सेलिब्रेशनसाठी रांगोळी आवर्जून हवी असते. त्यामुळे रांगोळी ही केवळ कलेपुरती मर्यादित न राहता आज तो अनेकांचा साईड बिजनेस झाला आहे. काही कुटुंबे तर पूर्णपणे रांगोळीवर अवलंबून आहेत. या कलेच्या माध्यमातून किती तरी कुटुंबांचे उदरभरण होत आहे. रांगोळीसाठी कोणी किती रक्कम आकारावी, हे त्या कलाकारावर अवलंबून असते. पण एका रांगोळीसाठी साधारण ६ हजार ते २५ हजार इतकीही रक्कम आकारली जाते. त्यामुळे रांगोळी हे आता उत्पन्नाचे एक साधन म्हणून गणले जाऊ लागले आहे.
(हेही वाचा – Electricity Employees Diwali Bonus : वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार खास; १८,५०० रुपयांचा बोनस जाहीर)
रांगोळी कुठे कुठे?
– वर्षभर विविध ठिकाणी सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. रांगोळीची विशेष प्रदर्शने होतात.
– बारसं, मुंज, लग्न, डोहाळे जेवण अशा प्रसंगी मोठमोठ्या रांगोळ्या हौसेने काढून घेतल्या जातात.
– मी तर एका श्रद्धांजली कार्यक्रमातही र्पोट्रेट (व्यक्तिचित्र) रांगोळी काढली होती !
– लग्नाच्या निमित्ताने वधू-वरांची र्पोट्रेट रांगोळी बऱ्याच ठिकाणी काढली जाते.
– काही ठिकाणी असाही अनुभव येतो की, त्या विवाहात जे अनुपस्थित आहेत, त्यांचीही र्पोट्रेट रांगोळी काढून घेतली जाते. एका वधू-वरांचे आई-वडील नव्हते; त्यांनी आई- वडीलांची र्पोट्रेट रांगोळी काढून घेतली होती !
– रांगोळी आता मोठ्या कंपन्या, कार्यालये, मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन या ठिकाणी दखलपात्र झाली आहे.
– २०१७ मध्ये मला दुबईतील एका कार्यक्रमातही रांगोळी काढण्यासाठी बोलावले होते