मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीबाग) बुधवार, २६ ऑक्टोबर रोजी भाऊबीज तथा दीपावली पाडव्याच्या दिवशी खुले राहणार आहे. तर गुरुवारी २७ ऑक्टोबर २०२२ रोजी प्राणिसंग्रहालय बंद राहणार असून पर्यटकांना भाऊबीजेच्या दिवशी प्राणिसंग्रहालयात बच्चे कंपनीसह सैर करता येणार आहे.
बुधवारी सार्वजनिक सुट्टी
भायखळा पूर्व परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीबाग) या उद्यान व प्राणिसंग्रहालयाची साप्ताहिक सुट्टी ही दर बुधवारी असते. मात्र, यापूर्वी महानगरपालिकेने मंजूर केलेल्या ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास, त्या बुधवारी हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले असेल. त्यानुसार येत्या बुधवारी म्हणजेच २६ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘भाऊबीज’ व ‘दीपावली पाडवा’ निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. मात्र, या सुट्टीच्या दिवशीही उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेच्या सुविधेकरिता खुले राहणार आहे. जेणेकरुन या सुट्टीच्या दिवशी लहान-थोरांना उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राणी, वनस्पती, पक्षी यांना पाहता येईल आणि एकूणच तेथील पर्यावरणाचा आनंद घेता येईल.
(हेही वाचा आता रितेश देशमुखच्या मागे चौकशीचा ससेमिरा)
गुरुवारी ऑक्टोबर, २०२२ रोजी जनतेकरिता बंद राहणार
बुधवारी राणीबाग जनतेकरिता खुले असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ते बंद ठेवण्यात येते. यानुसार प्राणिसंग्रहालय गुरुवारी ऑक्टोबर, २०२२ रोजी जनतेकरिता बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे. हे उद्यान दर बुधवारच्या साप्ताहिक सुट्टीचा दिवस वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवशी नागरिकांसाठी खुले असते. त्या दिवशी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० या दरम्यान उद्यानाची तिकीट खिडकी सुरु असते. तर उद्यान सायंकाळी ६.०० वाजता बंद होते, असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाटी यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community