स्वातंत्र्यवीरांच्या शब्दांनी बदललं बाबासाहेबांचं आयुष्य

बाबासाहेब म्हणाले, 'तुम्हा तरुण पिढीला हे सावरकर झेपायचे नाहीत. सावरकर म्हणजे तेज, तेज आणि तेज...' 

दोनच महिन्यांपूर्वीची गोष्ट… ९ सप्टेंबरला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि मी बाबासाहेबांना भेटलो. निमित्त होतं आम्ही अनुवादीत केलेल्या ‘सावरकर : विस्मृतीचे पडसाद’ या विक्रम संपत लिखित पुस्तकाच्या प्रकाशनाचं. दिलेल्या वेळी आम्ही बाबासाहेबांच्या घरी पोहोचलो.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.. वय वर्ष 100…तरीही बाबासाहेबांच्या सावरकरांच्या आठवणी अगदी ताज्या होत्या. डॉ. कमल गोखले आणि श्री. पु. गोखले या माझ्या आई-वडिलांची त्यांना आठवण देताच, ‘मी नेहमी यायचो आपल्या घरी’, असं ते म्हणाले. १९३८ ते सावरकरांच्या मृत्युपर्यंत त्यांची आणि सावरकरांची भेट होत राहिली. सावरकरांच्या आठवणी जागवताना, ‘काजव्यानं सूर्याची काय आठवण सांगायची’, असं म्हणत बाबासाहेब, सावरकरांचा हुबेहूब आवाज काढत, त्यांच्या आठवणीत अगदी सहज रमले… सावरकरांसमोरच त्यांच्या भाषणाची नक्कल सादर केल्यावर, सावरकरांनी बळवंत मोरेश्वर पुरंदरे या मुलाचे गुण हेरले आणि त्याला ‘केवळ नकला करत राहणार का?’, असं विचारत ‘या कलेचा स्वतःसाठी काहीतरी उपयोग कर’, अशी सूचना केली आणि तोच मुलगा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणून ख्याती पावला.

सावरकर म्हणजे तेज, तेज आणि तेज…

बाबासाहेबांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झाल्यावर पुस्तकाच्या नावातल्या ‘विस्मृती’ या शब्दाकडे बोट दाखवत बाबासाहेब म्हणाले, एखादं फुल ताजं असतं ना तशा तात्यांच्या आठवणी माझ्या मनात अगदी ताज्या आहेत. सनातनी लोकांचं आणि सावरकरांचं फार वाकडं. पुण्यातले जोशी नावाचे गृहस्थ अतिशय कडक सनातनी होते, ‘आमचं राज्य आलं तर या सावरकरांना आम्ही भर रस्त्यावर फाशी देऊ’, असं ते एकदा म्हणाले. सावरकरांना हे कळल्यावर ते म्हणाले, ‘अरे, मुकट्यापायी (सोवळ्यापायी) मुकुट गमावलात रे आणि आज स्वप्न पाहत आहात की, एका सावरकर नावाच्या माणसाला फाशी देण्याची. करायचंच असेल तर काबूल कंदाहारच्या पलीकडे जाऊन ज्याने भारताचा नाश केला, त्या अब्दालीच्या घराण्याचा नाश करा!’  सोवळ्याओवळ्या पायी तुम्ही राजसत्ता गमावलीत रे…हे सांगून बाबासाहेब म्हणाले, ‘तुम्हा तरुण पिढीला हे सावरकर झेपायचे नाहीत. सावरकर म्हणजे तेज, तेज आणि तेज…’

(हेही वाचा : बाबासाहेबांचे ‘ते’ स्वप्न कधी साकार होणार?)

बाबासाहेबांनी  ‘सावरकर : विस्मृतीचे पडसाद’ हे पुस्तक अगदी मनापासून निरखलं, त्यातली छायाचित्र पाहिली. त्यातील त्यांना आवडणारं तरुणपणीचं छायाचित्र आम्हाला दाखवलं. त्यांना आम्ही सावरकर कोलू फिरवतानाची प्रतिमा भेट दिली. तीही त्यांनी नीट पाहिली ..ते पुस्तकाची किंमत शोधत होते, ती त्यांना दिसली नाही. मग त्यांनी माझ्या हाती एक सहस्त्र रुपये ठेवले. आमच्यासाठी ती धनराशी नाही तर शंभरी गाठलेल्या, छत्रपती शिवरायमय झालेल्या बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे नावाच्या एका तपस्वीचे अनमोल आशीर्वाद होते…

एक प्रतिक्रिया

  1. मंजिरी, खूप छान आठवण सांगितली आहेस! हे असे क्षण कधीच न विसरले जाणारे असतात! शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली…..

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here