वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानाबाबत पोलिसात तक्रार करणार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर हे वीर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या राज्यात सुरू आहे. या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी वीर सावरकरांविषयी विधान केले. या आक्षेपार्ह विधानाबाबत रणजित सावरकर हे पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत.

(हेही वाचा – नेहरूंच्या गैरकृत्यांचा पुराव्यानिशी रणजित सावरकरांनी केला पर्दाफाश)

राहुल गांधी आणि काँग्रेसने सावरकरांचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही त्यांनी वीर सावरकरांचा अपमान केला आहे, असे रणजित सावरकर म्हणाले. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात रणजित सावरकर तक्रार दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासह शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळे हे देखील उपस्थित असणार आहेत. रणजित सावरकर यांनी सांगितले की, मी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या स्वातंत्र्यसैनिकाचा अपमान केल्याप्रकरणी मी ही तक्रार दाखल करणार आहे. काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करू पाहत असून तोच अजेंडा वापरून वीर सावरकरांचा अपमान करत आहे.

राहुल गांधींचे काय होते वादग्रस्त विधान

भारत जोडो यात्रेदरम्यान, जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. वीर सावरकर खरे देशभक्त नाहीत. ते तर इंग्रज राज्यकर्त्यांकडून निवृत्ती वेतन घेत होते. बिरसा मुंडा यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात उठाव केला. तर सावरकर हे देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरूंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले, असे विधान राहुल गांधींनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here