‘मी सौ. रश्मी उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री पदाची शपथ घेते की…’, चमकलात ना? पण ही शक्यता आता नाकारता येत नाही. जसे कोणाच्याही ध्यानीमनी नसताना उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्याप्रमाणे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही भविष्यात मुख्यमंत्री झाल्या तर नवल वाटून घेऊ नका. हा आता ही भविष्यवाणी करायला आम्ही कोणी ज्योतिषी नाही किंवा राजकीय तज्ज्ञ नाही. ही भविष्यवाणी केली आहे ती शिवसेनेच्या रणरागिणीने. राज्यात पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा बहुमान रश्मी वहिनींना मिळावा, अशी अपेक्षा थेट शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.
काय म्हणाल्या नीलमताई?
हिंदुस्थान पोस्टच्या वतीने 17 जुलै रोजी ‘ऑफबीट नीलम ताई… मुलाखत… थोडी हटके’ या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या मुलाखतीत आपली दिलखुलास मते मांडली. ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या सल्लागार संपादिका मंजिरी मराठे आणि संपादक स्वप्नील सावरकर यांनी ही मुलाखत घेतली. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी राजकारण, समाजकारण, महिला सबलीकरण या सर्व विषयांवर बिनधास्त आणि रोखठोक मते मांडली. ‘राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री किती काळाने मिळतील?’, या प्रश्नावर बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी ही मोठी भविष्यवाणी केली. ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून लॉंग टर्म १५-२० वर्षे काम करायला मिळावे, अशी आपली अपेक्षा आहे. पुढे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांना मोठी संधी मिळाल्यावर, जर रश्मी वहिनींना मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर आमचा त्यांना पाठिंबा असेल, अशा भावना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केल्या.
(हेही वाचाः मुख्यमंत्री-पवार यांच्यात पुन्हा एकदा भेट! कोणत्या विषयांवर झाली चर्चा?)
…तर तरुणींनी शिवसेनेत यावे
यशवंतराव चव्हाण यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून अशा ५० महिलांचे नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील काही जणी पुढे राजकारणात मोठ्या पदावर पोहचल्या. परंतु काही जणींना राजकारणात अधिक काळ कार्यरत राहणे शक्य झाले नाही. अशाप्रकारे ज्यांना जिल्ह्याच्या पलीकडे जाऊन व्यापक स्वरुपात समाजकारण, राजकारण करायचे आहे. अशा महिलांची मोठी टीम राजकारणात निर्माण झाली पाहिजे, असे आपल्याला वाटते. अशा महिला जेव्हा मला संपर्क करतात, त्यांना मी स्वतः तिकिटे दिली आहेत. अनेक जणी नगरसेवक, जिल्हा संघटक बनल्या आहेत. समाजातील तरुणींना जर राजकारणात येऊन काम करायचे असेल, तर त्यांनी शिवसेनेत यावे, त्यांच्यासाठी शिवसेनेत सुरक्षित वातावरण आहे, असे आवाहनही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
Join Our WhatsApp Community