वाढदिवसाला सापाची ‘मिठी’, स्वंयघोषित सर्पमित्राला मिळाली कायद्याची ‘काठी’

आपल्यापैकी ब-याच जणांना वाढदिवसाला भेट म्हणून आवडते कपडे, घड्याळ अशा  गोष्टींची सवय असेल. मित्र परिवाराकडून सरप्राईज म्हणून महागड्या किंवा आवडत्या भेटवस्तूऐवजी चक्क साप मिळाला तर? ऐकूनच कसेतरी वाटले ना… आपल्या वाढदिवसाला प्रांगणात उभ्या असलेल्या दुचाकीवर केक कापण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला चक्क सापाचीच मिठी मिळाली. आपल्या खांद्यावर अचानक साप आलेला पाहून बर्थडे बॉय घाबरला. हा स्टंट केला सोळा वर्षाच्या तरुणाने. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच सोलापूर वनविभागाने अनुराग लांबुतरे या सोळा वर्षाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोलापूरच्या सेंटरमेंट कॉलनीत राहणा-या अनुरागने ६ एप्रिल रोजी आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्यावेळी केक कापताना पाठून येऊन त्याच्या अंगावर साप टाकला. धामण या बिनविषारी सापाला त्याने मित्राच्या अंगावर टाकले. मात्र हा प्रयत्न अनुरागच्या अंगलट आला. सोशल मिडीयावर हा व्हिडिओ व्हायरल होताच सांगली वनविभागाने तासाभरात अनुरागला शोधून काढले. एका स्वयंसेवी संस्थेत अनुराग स्वयंघोषित सर्पमित्र असल्याचे आमच्या निदर्शनास आले. धामण ही संरक्षित प्रजाती असल्याने सार्वजनिक प्रदर्शन हा वन गुन्हा ठरतो. या प्रकरणी अनुरागवर गुन्हा दाखल केल्याची माहिती सोलापूर वनविभाग (प्रादेशिक)चे विभागीय वनाधिकारी धैर्यशील पाटील यांनी दिली.

माफिनामा

आपली स्टंटबाजी अंगलट आल्याचे समजताच अनुराग लांबुतरेने लगेचच वनविभागाला पत्र लिहून माफी मागितली. आपल्याकडून अनावधानाने हा प्रकार घडल्याचे स्पष्टीकरण अनुरागने दिले. वनविभागाच्या नियमांचे उल्लंघन न करता मी माझे काम करेन, असेही अनुरागने पत्राद्वारे लिहिले.

जनजागृतीवरही भर द्यावा

सापांविषयी आजही जनमनात संपूर्ण माहिती नाही. सापांना वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार वनविभागाकडून संरक्षण मिळाले आहे. सापांचे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करणे, तस्करी आदी घटना वन गुन्हा ठरतात. या बाबतीत वनविभागाने जनजागृतीवरही भर द्यावा.

– केदार भिडे, सर्पतज्ज्ञ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here