पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकाच्या वसुली रेटकार्ड प्रकरणी चौकशी सुरू

112

मुंबईतील एका पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडून त्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वसुली करण्यात येत असल्याचा आरोप एका व्यक्तीने अर्जाद्वारे केला आहे. या व्यक्तीने या अधिकाऱ्याचे ‘रेटकार्ड’च दिले आहे. मुख्यमंत्र्यांपासून पोलीस आयुक्तांपर्यत हा अर्ज आणि रेटकार्ड पोहचला असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव जरी या अर्जात लिहले असले तरी त्याचा अद्याप काहीही शोध लागलेला नसल्यामुळे अर्ज करणारी व्यक्ती नक्की कोण आहे, त्यासोबतच या अर्जाची सत्यता पडताळली जात आहे.

प्रकरणाचा तपास सुरू

कांदिवलीच्या ठाकूर कॉप्लेक्स येथील दिवाकर पी. शेट्टी नावाच्या एका व्यक्तीने समता नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांच्याविरुद्ध मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ विरोधात टाटा मोटर्सची मुंबई उच्च न्यायालयात धाव )

या अर्जात नरेंद्र शिंदे यांची तुलना सचिन वाझेशी केली आहे, शिंदे हे समता नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्यवसायिक, बार मालक, कंत्राटदार तसेच बांधकाम व्यवसायिक यांच्याकडे दरमहा वसुली करीत असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे. शिंदे यांनी या वसुलीसाठी खाजगी व्यक्तीची नेमणूक केली असल्याचे अर्जात म्हटले आहे. तसेच वसुलीचा रेटकार्ड अर्जात दिले आहे. समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंचल बार, नित्यानंद बार, ललित बार आणि सावली बारमधून दरमहा ७५,००० रुपये, तर इतर लेडीज बारमधून दरमहा ५० हजार ते ७५ हजार रुपये, बार आणि रेस्टॉरंट्सकडून दरमहा ६० हजार रुपये आणि फंक्शन्स आणि पार्टी आयोजित करण्यासाठी प्रति इव्हेंट २ हजार रुपये. लोढा, शिवम, यूके, आदित्य बिल्डर्सकडून दरमहा रु. ५०,००० तर इतर बिल्डर्सकडून ४०,००० प्रति महिना. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्सकडून दरमहा ३०,००० रुपये आणि बीएमसी कॉन्ट्रॅक्टर्सकडून दरमहा ५०,००० रुपये. रात्री चालणार्‍या रस्त्याच्याकडेला चालणार्‍या भोजनालयांकडून दरमहा १० हजार (एकूण २३ स्टॉल म्हणजे दरमहा २ लाख ३० हजार) आणि फालुदा आइस्क्रीमच्या स्टॉलमधून १० हजार रुपये, पान-गुटखा सिगारेट विकणाऱ्यांकडून प्रत्येकी ४ हजार रुपये दरमहा आणि फेरीवाले, भाजीपाला व फळ विक्रेते, पावभाजी विक्रेते, वडापाव विक्रेते, इडली विक्रेते इत्यादींकडून दररोज ५० ते २०० रुपये वसुलीचे रेटकार्ड आहे. जर कोणी पैसे न दिल्यास त्याला दररोज पोलीस कारवाई त्यात बाराशेचा दंड आकाराला जातो, असे अर्जात म्हटले आहे.

या अर्जाची दखल घेण्यात आलेली असून हे प्रकरण परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या अर्जाबाबत चौकशी सुरू असून त्यातील सत्यता पडताळण्यात येईल, सध्या याच्यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही असे घार्गे यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.