तुमच्याकडे रेशनकार्ड असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने अंत्योदय रेशन कार्डच्या लाभार्थींना एक खूशखबर दिली आहे. केंद्र सरकारने अंत्योदय कार्ड धारकांवर मोफत उपचार व्हावे यासाठी आयुष्यमान कार्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी सरकारकडून जिल्हा आणि तालुका पातळीवर सामुदायिक आरोग्य केंद्रावर विशेष अभियान चालवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत अंत्योदय कार्ड धारकाच्या सर्व कुटुंबातील सदस्याचे आयुष्मान कार्ड तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
कधीपर्यंत असणार अभियान
केंद्र सरकारकडून सर्व जनसुविधा केंद्रावर ही सुविधा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येथे नागरिक त्यांच्याकडे असणारे रेशन कार्ड दाखवून या सुविधा केंद्रावर आयुष्यमान कार्डसाठी अर्ज करू शकतात. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने सर्व अंत्योदय कार्ड धारकांसाठी आयुष्यमान कार्ड तयार करण्याचे आदेश दिले असून हे अभियान जिल्हा पातळीवर २० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
(हेही वाचा – वणी गडावरील सप्तशृंगीचे मंदिर दीड महिना बंद! भक्तांसाठी अशी असणार व्यवस्था)
कुठे काढता येणार आयुष्यमान कार्ड
दारिद्र रेषेखालील कुटुंबाना अंत्योदय रेशन कार्ड मिळते. या कार्डवर लाभार्थ्यांना दर महिन्याला माफक दरामध्ये जीवनावश्यक अन्नधान्य पुरविले जाते. कार्डधारकांना ३५ किलो ग्रॅम गहू आणि तांदुळ प्रतिकिलो २ आणि ३ रूपये दराने उपलब्ध करून दिला जातो. हा लाभ ज्यांना मिळतोय पण आतापर्यंत त्यांच्याकडे (अंत्योदय कार्डधारकांजवळ) आयुष्यमान कार्ड आलेले नाही, असे कार्डधारक २० जुलैपर्यंत आपली प्रक्रिया पूर्ण करू शकतात. पात्र लाभार्थी जनसेवा केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्यमान पॅनलशी संबंधित खासगी रूग्णालये किंवा जिल्हा रूग्णालयामध्ये आपले अंत्योदय कार्ड दाखवून आपल्या कुटुंबांचे आयुष्यमान कार्ड तयार करून घेऊ शकतात.
Join Our WhatsApp Community