अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळाले आहेत. डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी मंगळवारी यासंदर्भात घोषणा केली.
राज्यपालांनी डॉ. संजय घनश्याम भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. डॉ. रवींद्र कुलकर्णी हे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत; तर डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.
(हेही वाचा Islamic Encroachment : आता पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेली पर्वती टेकडी इस्लामी अतिक्रमणाची शिकार )
यांच्यात होती स्पर्धा
मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु पदासाठी कुलगुरु शोधसमितीने १९ मे रोजी २० जणांच्या मुलाखती घेतल्यानंतर २६ मे रोजी राजभवन येथे पाच जणांच्या मुलाखती पार पडल्या. या पाच जणांमध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक सुरेश गोसावी, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख ज्योती जाधव, भाभा ऑटोमिक संशोधन केंद्रांच्या शास्त्रज्ञ अर्चना शर्मा, बनारस हिंदू विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक, तेज प्रताप सिंग यांचा समावेश होता. त्यात रवींद्र कुलकर्णी यांनी बाजी मारली आहे.