राजकीय अस्थिरता आणि अर्थव्यवस्थेला असलेला चिनी विळखा! श्रीलंकेच्या दुरावस्थेची कारणे

151

सध्या भारताच्या शेजारील देश श्रीलंकेवर फार मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. श्रीलंकेवर ओढावलेल्या या संकटाचे जगभरातील अर्थतज्ज्ञांकडून विश्लेषण करण्यात येत आहे. विख्यात अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी श्रीलंकेवर आलेल्या या आर्थिक संकटामागचे विश्लेषण हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या माहितीत केले आहे.

चीनची गुंतवणूक की फसवणूक?

देशाच्या अंतर्गत अर्थकारणाचा वेग वाढेल या दृष्टीकोनातून आपण विदेशी आर्थिक गुंतवणुकीकडे बघतो. विदेशी गुंतवणूक ही थेट आर्थिक स्वरुपात किंवा तंत्रज्ञानाच्या स्वरुपात येत असते. श्रीलंकेतही या मार्गाने गुंतवणूक आली. पण त्याचबरोबर देशातील पायाभूत सुविधा सुद्धा विदेशी देशांना वापरायला देण्याच्या अटीवर श्रीलंकेने विदेशी गुंतवणूक स्वीकारली आहे. श्रीलंका अमेरिका, युरोप, सिंगापूर, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांकडून श्रीलंकेत मर्यादित आर्थिक गुंतवणूक करण्यात आली. पण श्रीलंकेतील महत्त्वाची बंदरे चालवण्याचा अधिकारही श्रीलंकेकडून चीनने परकीय गुंतवणुकीच्या बदल्यात घेतला.

चीनने केली आर्थिक कोंडी

कोरोना काळात ज्या पद्धतीने चीनवर अघोषित आर्थिक बहिष्कार टाकण्यात आले त्याचाही फटका श्रीलंकेला बसला. कारण श्रीलंकेला विदेशी कर्जावर द्यावं लागणारं व्याज हे सुद्धा चिनी चलनातून द्यावं लागत होतं. चिनी चलनाचा विनिमय दर हा चिनी सरकारकडून ठरवण्यात येतो. त्यामुळे चीनवर आलेल्या आर्थिक निर्बंधांनंतर चीनने आपला हा विनिमय दर जास्त कडक केला. त्यामुळे श्रीलंकेला व्याजाच्या रुपात चीनला जास्त पैसे द्यावे लागत होते. त्यामुळे चीनने श्रीलंकेची चांगलीच आर्थिक कोंडी केली.

राजकीय अस्थिरता दुरावस्थेचे कारण

एकीकडे श्रीलंकेची आर्थिक कोंडी झालेली असतानाच दुसरीकडे श्रीलंकेतील राजकीय अस्थिरता ही सुद्धा या परिस्थितीला कारणीभूत ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीलंकेत राजकीय अस्थिरता आहे. देशाचं आर्थिक धोरण हे देशातील सरकारकडून दीर्घकाळासाठी तयार करण्यात आलेलं असतं, त्यामुळे त्याची अंमलबजावणी सुद्धा दीर्घ काळासाठी झाली तर देशाची आर्थिक भरभराट होते. त्यामुळे कुठल्याही देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये सातत्य असणं गरजेचं असतं. पण श्रीलंकेतील बदलत्या राजकीय सरकारांमुळे हे सातत्य राहिले नाही. तसेच या अस्थिरतेमुळे श्रीलंका आपली राजकीय विश्वासार्हता देखील गमावून बसला. त्यामुळे इतर देशही श्रीलंकेच्या मदतीला धावून आले नाहीत.

श्रीलंकेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा पर्यटन आहे. पण कोरोना आणि आधीपासून असलेली राजकीय अस्थिरता यांमुळे सगळ्यात मोठा फटका श्रीलंकेच्या पर्यटन व्यवसायाला बसला. त्यामुळे सततची राजकीय अस्थिरता आणि चिनी ड्रॅगनने श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला घातलेला विळखा यांमुळे श्रीलंकेवर सध्याची ही परिस्तिथी ओढावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.