एनआयएने मुंबईसह मीरा भाईंदर या ठिकाणी दाऊद टोळीशी संबधित लोकांच्या घरी छापे टाकून ७ ते ८ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी माहीम येथून ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची चौकशी करून सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. माहीम दर्गाचे विश्वस्त सुहेल खंडवाणी आणि मोबिदा भिवंडीवाला अशी चौकशी करून सोडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. छोटा शकीलचा मेव्हुणा सलीम फ्रुट, अब्दुल कयुम शेख, समीर हंगोरा, अजय गोसालियासह पाच जणांकडे चौकशी सुरु असून या पाच जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एनआयएच्या तपासात समोर आले
एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेकडून सोमवारी मुंबईसह मीरा भाईंदर येथील दाऊद टोळी संबंधित लोकांच्या २४ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. एनआयएकडून फेब्रुवारी महिन्यात सुओ मोटो दाखल केल्या गुन्ह्या संदर्भात ही छापेमारी करण्यात आली होती. ही कारवाई डी-कंपनीच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क, दहशतवादी, गुन्हेगारी कारवायांशी संबंधित असून ज्यामध्ये दाऊद इब्राहिम कासकर आणि हाजी अनीस उर्फ अनीस इब्राहिम शेख, शकील शेख उर्फ छोटा शकील, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक यांचा समावेश आहे. टायगर मेमन याने दाऊदच्या मदतीने शस्त्रास्त्रांची तस्करी, नार्को टेररिझम, मनी लाँड्रिंग, एफआयसीएनचे यांच्यामधून आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेसाठी निधी उभा केल्याचे एनआयएच्या तपासात पुढे आले होते. अंडरवर्ल्डसाठी हवाला रॅकेट चालविणारे तसेच अंडरवर्ल्डचा काळापैसा बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केल्याप्रकरणी माहीम दर्गाचे विश्वस्त सुहेल खंडवाणी आणि मोबिदा भिवंडीवाला, छोटा शकीलचा मेव्हुणा सलीम फ्रुट, अब्दुल कयुम शेख, समीर हंगोरा, अजय गोसालियासह सात जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी काही जणांकडे महत्वाचे कागदपत्रे, शस्त्रे मिळाली आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या सात जणांपैकी सायंकाळी एनआयने मोबिदा भिवंडीवाला आणि सुहेल खंडवानी यांच्याकडे चौकशी करून त्यांना सोडून दिले, मात्र चौकशीसाठी बोलाविल्यास त्यांना यावे लागेल या अटीवर सोडण्यात आले आहे. दरम्यान सलीम फ्रुट, अजय गोसालिया, अब्दुल कयूम शेख, समीर हंगोरे, यांच्याकडे चौकशी सुरु असून त्यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community