प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या आठवड्यात बिग बाजारचा ताबा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता कंपनीने फ्युचर ग्रुपच्या या सर्वात मोठ्या ब्रँडचे नाव बदलण्याची तयारीही केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किशोर बियानी यांच्या कंपनीच्या रिटेल स्टोअर्सच्या संचालनाची जबाबदारी रिलायन्सने हाती घेतली होती. त्यामुळे काही दिवस बिग बाजारचे बहुतांशी स्टोअर्स बंद होते.
(हेही वाचा – मला विचारलेले प्रश्न आरोपीचे! फडणवीसांनी सरकारचा उघड केला मनसुबा)
बिग बाजार आता स्मार्ट बाजार
रिलायन्स रिटेल आता बिग बाजार असलेल्या सर्व ठिकाणी नवीन रिटेल स्टोअर्स उघडणार आहे. त्यामुळे या नवीन स्टोअरचे नाव आता बिग बाजार न राहता स्मार्ट बाजार झालेले दिसणार आहे. रिलायन्स रिटेल ही मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची रिटेल क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून रिलायन्स ट्रेंड्स, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स डिजिटल सारखी रिटेल स्टोअर्स चालविण्यात येत आहे.
950 ठिकाणी सुरू होणार स्मार्ट बाजार
रिलायन्स रिटेलची 950 ठिकाणी स्वतःची दुकाने उघडण्याची योजना आहे. ही सर्व ठिकाणे कंपनीने फ्युचर ग्रुपकडून ताब्यात घेतली आहेत. एका वृत्त संस्थेच्या बातमीनुसार, कंपनी या महिन्यात सुमारे 100 ठिकाणी ‘स्मार्ट बाजार’ नावाने स्टोअर उघडणार आहे. मात्र, या संदर्भात रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुपकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
असेच झाले बिग बझारचे टेकओव्हर
फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यातील 24 हजार 710 कोटी रुपयांच्या कराराला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. परंतु अॅमेझॉनसोबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईमुळे व्यवहार पूर्ण झाला नाही. गेल्या आठवड्यापासून, रिलायन्सने आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आणि फ्यूचर ग्रुपचे बिग बाजारचे स्टोअर ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.
Join Our WhatsApp Community